Wed, Mar 27, 2019 03:56होमपेज › Kolhapur › गाळप वाढले; उतारा घसरला

गाळप वाढले; उतारा घसरला

Published On: Jan 11 2018 1:07AM | Last Updated: Jan 10 2018 11:54PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : विठ्ठल पाटील

यंदाच्या हंगामात उसाचे गाळप आणि साखरेचे उत्पादनही वाढले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही वाढ  झाली असतानाच साखर उतारा मात्र घटला आहे. गेल्या हंगामात सात जानेवारीपर्यंत राज्यातील 149 साखर कारखान्यांकडून 240.58 लाख क्‍विंटल साखर उत्पादन झाले होते आणि साखर उतारा 10.54 टक्के होता. यंदा 182 कारखान्यांकडून 440.47 लाख क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, राज्याचा सरासरी साखर उतारा 10.36 टक्के आहे.

यंदा गाळप हंगाम घेणार्‍या कारखान्यांची संख्या वाढली आहे. त्यात सहकारी 98 आणि खासगी 84 कारखान्यांचा समावेश आहे. अशाप्रकारे 182 कारखान्यांची दैनिक गाळप क्षमता 6 लाख 64 हजार 580 टन आहे. त्यानुसार सात जानेवारीपर्यंत राज्यात 425.01 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्याद्वारे 440.47 लाख क्‍विंटल साखर उत्पादन झाले. गेल्यावर्षी हेच प्रमाण सहकारी कारखाने 87, खासगी कारखाने 62 मिळून 149 कारखान्यांद्वारे दैनंदिन गाळप 5 लाख 34 हजार टन केले जात होते. त्याद्वारे 228.23 लाख टनाचे गाळप सात जानेवारी 2016 पर्यंत झाले होते. त्यानुसार 240.58 लाख क्‍विंटल साखर उत्पादन झाले होते. गेल्यावर्षीची तुलना पाहता यंदा साखर उतार्‍यात घट झाली आहे. 10.54 वरून 10.36 पर्यंत साखर उतारा घटला असल्याचे साखर संचालक कार्यालयाच्या अहवालात स्पष्ट केले आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा गाळप आणि साखर उत्पादनही वाढणार आहे. उसाची उपलब्धता आहेच; पण त्याचबरोबर राज्यातील गाळप हंगाम घेणार्‍या कारखान्यांची संख्याही अधिक आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत राज्याचा सरासरी साखर उतारा 00.18 टक्क्याने कमी आहे. पुढील काही दिवसांत उतारा वाढू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.