Wed, Nov 21, 2018 08:00होमपेज › Kolhapur › मूल्यांकन घटले; ऊस बिले तटली!

मूल्यांकन घटले; ऊस बिले तटली!

Published On: Jan 18 2018 1:47AM | Last Updated: Jan 18 2018 12:54AM

बुकमार्क करा
राशिवडे : प्रतिनिधी

बाजारपेठेमध्ये साखरेचे दर घसरल्याने उत्पादित साखरेची विक्री न झाल्याने कारखान्यांची गोडावून हाऊसफुल्ल झाली आहेत. राज्य बँकेनेही साखरेचे मूल्यांकन कमी केल्याने गाळप झालेल्या उसाची बिले देताना त्रेधातिरपीट उडत आहे. साखर दरच घसरल्याने कारखाने अंदाजे  700 कोटींच्या आसपास शॉर्ट मार्जिनमध्ये सापडले असून, साखर कारखान्यांना आर्थिक तोल सांभाळताना कसरत करावी लागत आहे.

जिल्ह्यातील सहकारी 26 व खासगी 11 अशा 37 साखर कारखान्यांनी 1,15,15,966 लाख मे. टन उसाचे गाळप करून 1,35,62,670 मे. टन साखर उत्पादित केली असून, सरासरी साखर उतारा 11.78 पर्यंत पोहोचला आहे. साखर उद्योगाबाबतच्या बदलत्या धोरणांनी कर्जातील साखर कारखान्यांचे चांगलेच आर्थिक कंबरडे मोडले असतानाच चालू गळीत हंगाम कसाबसा सुरू केला आहे. सध्या गळीत सुस्थितीत सुरू असताना, साखर दर मात्र उतरणीला लागला आहे. उत्पादित साखरेवर कर्ज देणार्‍या बँकांनीही मूल्यांकन कमी केले आहे. मूल्यांकनाच्या 85 टक्के कर्ज उचल बँकेकडून दिली जाते. बँकेचे कर्ज हप्ते, व्याज, प्रक्रिया खर्च आदी रक्कम वजा करून कारखानदारांच्या हातात 1,800 रुपये पडतात. नोव्हेंबर, डिसेंबर या दोन महिन्यांत प्रतिक्विंटल 120 रु., 110 रु.,170 रु. असे 400 रुपयांचे मूल्यांकन कमी केले आहे.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा एफ.आर.पी. अधिक 200 असा फॉर्म्युला ठरल्याने सरासरी तीन हजारच्या आसपास प्रतिटन ऊस दर ठरल्याने बँकेकडून मूल्यांकन होऊन मिळणारी 1,885 रुपये प्रतिटन उचल व उसासाठी द्यावा लागणारा 2,900 ते 3,100 रुपये दर पाहता किमान 1,100 ते 1,200 प्रतिटन कमी पडणारे पैसे कुठून उभा करायचे, हा प्रश्‍न कारखानदारांसमोर उभा राहिला आहे.

साखरेचे दर घसरल्यानंतर आयात बंदी, आयात कर वाढवणे, साखरेचा बफर स्टॉक करणे सरकारचे कर्तव्य आहे; पण सरकार शेतकरीविरोधी धोरण राबवत आहे. शेतकर्‍यांसाठी ऊस दर व घसरलेल्या साखर दराने निर्माण झालेल्या शॉर्ट मार्जिनची रक्कम सरकारने कारखान्यांना अनुदान रूपाने द्यावी, अशी साखर रखानदारांकडून मागणी होत आहे.