Mon, Apr 22, 2019 16:05होमपेज › Kolhapur › नियंत्रणमुक्‍तीत स्वयंनियंत्रण आवश्यक

नियंत्रणमुक्‍तीत स्वयंनियंत्रण आवश्यक

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 23 2018 11:09PMकुडित्रे : प्रा. एम. टी. शेलार

केंद्र सरकारने 2013 च्या दरम्यान साखर उद्योग नियंत्रणमुक्‍त केला आहे. त्यामुळे रीलिज ऑर्डर मेकॅनिझम व लेव्ही साखरेतून मुक्‍ती मिळाली, पण साखरेला जीवनावश्यक वस्तूचा दर्जा असल्याने सरकारचे साखर दरावर नियंत्रण असणार आहेच. त्यामुळे सरकार परत  रीलिज ऑर्डर मेकॅनिझम  आणण्याचा विचार करीत आहे. 

वाढत्या उत्पादन खर्चामुळे, व्यावसायिक कल्पकतेच्या अभावामुळे अनेक सहकारी साखर कारखाने बंद पडून खासगी कंपन्यांच्या ताब्यात जात आहेत. त्यामुळे या नियंत्रण मुक्‍तीच्या काळात सहकारी साखर कारखान्यांनी स्वयंनियंत्रण  ठेवणे आवश्यक आहे. नियंत्रणमुक्‍तीत व्यावसायिकता, कल्पकता न दाखवल्यामुळे हा खासगीकरणाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. उत्पादन खर्चात बचत, उपपदार्थ व मूल्यवर्धित वस्तूंचे उत्पादन, साखरेचा दर्जा नियंत्रण या चौसूत्रीचा अवलंब केल्यासच साखर उद्योग टिकणार आहे.

साखरेचे मार्केटिंग आवश्यक
सहकारी साखर कारखानदारांनी आपापसांतील स्पर्धा विसरून स्वयंनियंत्रण निर्माण करण्याची गरज आहे. आजपर्यंत साखरेच्या विक्रीबाबत साखर कारखानदारांना प्रयत्नच करावे लागले नाहीत. 1941 पासून कधी पूर्ण नियंत्रण, कधी आंशिक नियंत्रण यात वाढलेल्या कारखान्यांनी संशोधनाकडे पाठच फिरवली. सरकारला ठरलेल्या दरात एकूण उत्पादनापैकी 90 टक्के साखर लेव्ही म्हणून देऊन उरलेली केवळ 10 टक्के साखर केंद्र सरकारकडून महिन्याला, पंधरवड्याला कोट्यानुसार विकणे यापलीकडे कधी मार्केटिंगच झाले नाही. यापुढे साखरेला स्वतःचा ग्राहकवर्ग निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी ट्रेडमार्कस, पेटंट्स निर्माण करावे लागतील. सरकारकडे साखरेला हमीभाव बांधून मागण्याऐवजी पोत्यावर एम.आर.पी. छापून त्यापेक्षा कमी दरात साखर विकायची नाही, अशी गट्टी करावी लागेल. आता कारखानदार गट्टी करतात ती फक्‍त ऊस उत्पादकाच्या ऊस दराबाबत.

उसाशिवाय साखर कारखानदारी
खासगी साखर कंपन्या कच्ची साखर आयात करून त्यावर प्रक्रिया करून अशी रिफाईंड साखर निर्यात करतात. त्यांनी समुद्रकिनार्‍यालगतच रिफायनरीज उभारल्या आहेत. ही रेडिमेड साखर कारखानदारी सहकारी साखर कारखान्यांना घातक ठरत आहे. बंद पडलेले साखर कारखाने चालवायला घेऊन तेथे कच्ची साखर उत्पादन करून वर्षभर चालणार्‍या रिफायनरीज कार्पोरेट सेक्टरकडे आहेत. या कार्पोरेट सेक्टरशी टक्‍कर देण्यासाठी सहकाराला कार्पोरेट व्हावे लागेल.   

निर्यातक्षम साखरनिर्मिती आवश्यक
ब्राझील, क्युबा सारखी राष्ट्रे  रिफाईंड  साखर उत्पादन करतात. प्रगत राष्ट्रे हीच साखर खरेदी करतात. भारतात असे प्रयत्न झाले नाही असे नाही , पण त्यात फारशी प्रगती नाही. ‘रेणुका’च्या स्वतःच्या रिफायनरीज आहेत त्यामुळे त्यांच्या साखरेला मागणी आहे. आपल्या  डबल सल्फीटेशन  मेथडने उत्पादित झालेल्या साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारात ( विशेषत: प्रगत राष्ट्रात) ग्राहक मिळत नाहीत. ब्राझील, क्युबा सारखी राष्ट्रे वेगवेगळ्या चवीची, आकाराची व पोषणमूल्ये असणारी 24 प्रकारची साखर तयार करतात.