Thu, May 28, 2020 08:56होमपेज › Kolhapur › साखर मूल्यांकनात 130 रुपये वाढ

साखर मूल्यांकनात 130 रुपये वाढ

Published On: Feb 22 2018 1:25AM | Last Updated: Feb 22 2018 12:39AMकोल्हापूर : प्रतिनिधी

सतत ढासळत्या दरानंतर आता साखर दरात वाढ होऊ लागली आहे. मागील काही दिवसांत साखर  दरात क्‍विंटलमागे सरासरी 350 ते 400 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्य सहकारी बँकेने साखरेच्या मूल्यांकनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मूल्यांकनामध्ये 130 रुपये वाढ करण्यात आली आहे. मूल्यांकन 2,970 वरून 3,100 रुपयांपर्यंत वाढले आहे. वाढलेल्या मूल्यांकनामुळे कारखानदारांना पहिली उचल देण्यासाठी काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

गेल्या चार महिन्यांपासून घाऊक बाजारात साखरेच्या दरात सातत्याने घसरण होत होती. त्यामुळे दर कमी होईल, तसे राज्य सहकारी बँकेने साखर मूल्यांकन तब्बल तीनवेळा कमी केले. राज्य बँकेच्या या निर्णयामुळे एकूण मूल्यांकनाच्या 85 टक्के रक्‍कम मिळणार होती. त्यामधील प्रक्रिया खर्च व कर्जावरील व्याजापोटी रक्‍कम वजा जाता कारखानदारांना पहिल्या उचलीपोटी बँकांकडून केवळ 1,775 रुपये मिळत होते. त्यामुळे शॉर्टमार्जिनचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला होता. या सर्वाचा परिणाम म्हणून कारखानदारांनी पहिल्या उचलीत 500 रुपयांची कपात केली. कारखानदारांच्या या निर्णयाविरोधात उत्पादक व शेतकरी संघटनांमध्ये संघर्ष निर्माण होऊ लागला आहे.

दरम्यान, साखर दरात वाढ होऊ लागली असून कारखानदारांना पहिल्या उचलीपोटी प्रतिटन 1,885 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे कारखानदारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, वाढलेल्या मूल्यांकनाबाबत कारखानदारांमध्ये काय भूमिका घेतात, यावरच संघर्ष होणार की हंगाम सुरळीत पार पडणार, हे ठरणार आहे.