Sat, Sep 22, 2018 12:39होमपेज › Kolhapur › साखर बफर स्टॉकसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार

साखर बफर स्टॉकसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार

Published On: Dec 29 2017 1:34AM | Last Updated: Dec 29 2017 1:26AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

साखरेचे दर गडगडल्याने हा उद्योग अडचणीत आला आहे. यातून बाहेर येण्यासाठी साखरेचा बफर स्टॉक करणे, राज्य बँकेकडून साखरेवरची उचल वाढवून घेणे आदी निर्णय घेणे आवश्यक आहे. यासाठी येत्या मंगळवारी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री व सहकारमंत्र्यांची भेट घेऊन यावर तोडगा काढला जाईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सर्किट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. हसन मुश्रीफ, आ. चंद्रदीप नरके, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार पी. एन. पाटील, के. पी. पाटील, प्रा. संजय मंडलिक, अशोक चराटी, माधवराव घाटगे आदी उपस्थित होते.

ना. पाटील म्हणाले, साखर हंगाम सुरू करताना एफआरपी अधिक 200 रुपये या प्रस्तावास सर्वांनी मान्यता दिली होती. या दरापेक्षाही अनेक साखर कारखान्यांनी जादा दर दिले. त्यावेळी साखरेचा दरही प्रतिक्‍विंटल 3550 रुपये इतका होता. मात्र, आता हा दर 3050 रुपये इतका खाली आहे. जवळपास 500 रुपयांचे नुकसान होत असल्याने कारखाने अडचणीत येत असल्याने यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे  ना. पाटील यांनी सांगितले.

तत्पूर्वी, साखर कारखानदारांच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती आ. मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. कारखानदारांनी तोडग्यानुसार पैसे दिले आहेत. मात्र, अखेरच्या टप्प्यात अडचणी येणार आहेत. साखर संकुलात शुक्रवारी सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांची बैठक होणार असून त्यातही याबाबत चर्चा होणार असून मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेण्याची मागणी त्यांनी केली. खा. शेट्टी यांनीही साखर दराबाबत सर्वत्र एकच धोरण राबवण्याचा सल्‍ला त्यांनी दिला. खा. महाडिक यांनी जरी दराबाबत प्रश्‍न विचारला असला तरी त्याला उत्तर मिळालेले नाही. शून्य प्रहरातील चर्चा टीव्हीवर दिसण्यासाठी उपयोगाला येत असल्याचा टोला त्यांनी लावला.

यापूर्वी साखरेवर एक्साईजची ड्युटी लागत होती. याचा लाभ केंद्र शासनाला होत होता. आता साखरेवर जीएसटी लागणार असल्याने जमा होणार्‍या या करातील काही रक्‍कम राज्य शासनाला मिळणार आहे. त्यामुळे राज्याच्या उत्पन्‍नात वाढ होणार आहे. त्यामुळे शासनाने साखर उद्योगाला मदत करावी, अशी मागणी माजी मंत्री विनय कोरे यांनी केली.