Tue, Apr 23, 2019 20:25होमपेज › Kolhapur › साखर निर्यात शुल्क कपातीचा निर्णय दोन दिवसांत?

साखर निर्यात शुल्क कपातीचा निर्णय दोन दिवसांत?

Published On: Mar 14 2018 12:52AM | Last Updated: Mar 14 2018 12:11AMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

देशात चालू हंगामात साखरेचे अपेक्षेपेक्षा वाढणारे उत्पादन आणि आगामी हंगामातही साखरेच्या विक्रमी उत्पादनाचे संकेत या पार्श्‍वभूमीवर साखर कारखानदारीची संभाव्य आर्थिक कोंडी रोखण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यामध्ये साखरेचे निर्यात शुल्क 20 टक्क्यांनी कमी करण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये या निर्णयावर शिक्‍कामोर्तब होईल, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

बाजारातील साखरेचे दर वाढू नयेत, यासाठी केंद्र शासनाने साखरेच्या निर्यातीचे दरवाजे बंद केले होते. जून 2017 मध्ये केंद्राने हा निर्णय घेताना साखरेवरील निर्यात शुल्क 20 टक्क्यावर नेले होते. तथापि, देशातील साखर उद्योगात आता चालू हंगामातील विक्रमी उत्पादनाच्या संकेतामुळे संपूर्ण समीकरण बदलले आहे. यंदाच्या हंगामात साखरेचे उत्पादन आजवरचे सारे विक्रम मोडून 295 लाख मे. टनावर पोहोचेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे आणि आगामी हंगामातही साखरेच्या विक्रमी उत्पादनाचे संकेत मिळाले आहेत.

या दोन्ही बाबींमुळे देशात साखरेची उपलब्धता मोठी होऊन उद्योग आर्थिक अडचणीत येऊ शकतो. या पार्श्‍वभूमीवर ‘इस्मा’, ‘विस्मा’ तसेच नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर इंडस्ट्रीज या साखर कारखान्याच्या राष्ट्रीय स्तरावरील शिखर संघटनांच्या प्रतिनिधींनी केंद्रीय अन्‍न सचिवांची भेट घेऊन त्यांना साखरेवरील निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी केली. या मागणीवर येत्या दोन दिवसांत निर्णय अपेक्षित आहे.

साखरेवरील निर्यात शुल्क कमी करण्याचा निर्णय हा केंद्रीय महसूल खात्याच्या अखत्यारित आहे. साखर कारखानदार संघटनांच्या प्रतिनिधींच्या मागणीची दखल घेऊन केंद्रीय अन्‍न मंत्रालयाने महसूल खात्याकडे याविषयीचा प्रस्तावही पाठविला आहे. यावर निर्णयाची प्रतीक्षाही सुरू होती. दरम्यान, अन्‍न सचिवांची बदली झाल्याने हा निर्णय काही काळासाठी पुढे गेला असला, तरी येत्या दोन दिवसांत यावर शिक्‍कामोर्तब होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

केंद्र शासनाने साखरेवरील निर्यात शुल्क घटविण्याचा निर्णय घेतला, तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील साखरेचा दर पाहता तातडीने निर्यातीला मोठी गती मिळेल, अशी स्थिती सध्या नाही. कारण या दोन्ही दरांमध्ये प्रतिक्विंटल 650 रुपयांचा फरक आहे. तरीही मध्यपूर्व आशिया, आफ्रिका आणि दक्षिण आशिया या देशांमध्ये साखर निर्यातीला थोडा वाव असल्याचे जाणकारांचे मत आहे. यापेक्षा निर्यातीचे दरवाजे खुले झाल्यानंतर साखर बाजारातील मानसिकता बदलून दरामध्ये थोडा सुधार होईल, असे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना स्पष्ट केले.