होमपेज › Kolhapur › आता संघर्ष उसाच्या फडात!

आता संघर्ष उसाच्या फडात!

Published On: Jul 23 2018 1:08AM | Last Updated: Jul 22 2018 11:35PMकोल्हापूर : निवास चौगले

दुधाच्या दरासाठी केेलेल्या आंदोलनाला यश आल्यानंतर आता यावर्षीच्या उसाच्या दरावरूनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबरच साखर कारखानदारविरुद्ध सरकार असा संघर्ष अटळ आहे. एफआरपी ठरवतानाच्या मूलभूत उतार्‍यात केलेल्या वाढीवरून संघटना, तर साखरेचा हमीभाव वाढवावा यासाठी कारखानदार सरकारविरोधात राहतील, अशी शक्यता आहे.

यावर्षीच्या हंगामाची सांगता लोकसभा निवडणुकीने होणार आहे. त्यामुळे शेतकरी प्रश्‍नांवर नेहमीच रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी हे ही संधी सोडणार नाहीत. किंबहुना, ऊस दरावरून पुन्हा एकदा शेतकर्‍यांची सहानुभूती मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील असतील. 

गायीच्या दूध खरेदी दरात कपात केल्यानंतर उत्पादकांच्या हातात काहीच राहत नव्हते. हे लक्षात आल्यानंतर शेट्टी यांनी दूध दराचे आंदोलन हातात घेतले. त्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला. त्यातून आंदोलनाला यश मिळाले. आता येणारा साखर हंगाम त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. यावर्षी केंद्र सरकारने एफआरपीची रक्कम ठरवताना मूलभूत उतारा साडेनऊ टक्क्यांवरून 10 टक्के केला. याला पहिल्यापासून शेट्टी यांचा विरोध आहे. त्याचा फटका शेतकर्‍यांना बसणार आहे. किमान प्रतिटन 140 रुपयांचा तोटा शेतकर्‍यांना सहन करावा लागणार आहे. हाच मुद्दा उचलून शेट्टी साखर हंगामात आंदोलन करण्याची शक्यता आहे. 

उतार्‍याबरोबरच साखरेचे हमीभाव निश्‍चित झाल्याने पहिल्या उचलीतही वाढ व्हावी, अशी त्यांची मागणी असणार आहे. गेल्या हंगामात पहिल्या उचलीपोटी 3,400 रुपयांची मागणी करण्यात आली. तडजोडीनंतर एफआरपी अधिक प्रतिटन 200 रुपये यावर मार्ग निघाला; पण नंतर साखरेचे दरच कोसळल्याने शेवटच्या दोन-तीन महिन्यांत प्रतिटन 2,500 रुपये अशीच रक्कम उत्पादकाला मिळाली. आता गेल्या हंगामातील एफआरपी किती थकीत आहे, याचा आढावा शेट्टी यांच्याकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. वाढीव एफआरपीवर शेतकरी खूश आहेत, थकीत रकमेबाबत शेतकर्‍यांचा अंदाज घेऊन शेट्टी आपली रणनीती ठरवण्याची शक्यता आहे.

यावर्षी उसाचे उत्पादन जास्त असल्याने सरकार ऑक्टोबरमध्येच हंगाम सुरू करण्याच्या तयारीत आहे. साखर उत्पादन होणार्‍या सर्वच राज्यांत हा प्रश्‍न आहे. दुसरीकडे, एफआरपी वाढवली तर साखरेच्या हमीभावातही वाढ करावी, अशी या उद्योगाची मागणी आहे. एफआरपी ठरवताना जो साखर दर असतो तोच असावा, असे या उद्योगाचे म्हणणे आहे; अन्यथा हंगामाच घेणार नाही, असा इशारा यापूर्वीच उद्योगाकडून दिला आहे. या मुद्द्यावरून कारखानदारविरुद्ध सरकार असा संघर्ष होण्याची शक्यता आहे. साखरेला किमान प्रतिक्विंटल 3,500 रुपये दर मिळावा, अशी या उद्योगाची मागणी आहे.