Tue, Jul 16, 2019 01:40होमपेज › Kolhapur › साखर उद्योग ‘डेंजर झोन’मध्ये

साखर उद्योग ‘डेंजर झोन’मध्ये

Published On: Mar 19 2018 1:46AM | Last Updated: Mar 19 2018 1:23AMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

देशात हिंदू कॅलेंडरप्रमाणे सणांच्या शृंखलेला प्रारंभ करण्यासाठी गुढी सजली असताना भारतीय साखर उद्योगात डेंजर झोन सुरू झाला आहे. केंद्र शासनाने निर्यातीविषयी हालचाली सुरू केल्यानंतर गेल्या पंधरवड्यात होलसेल बाजारात साखरेच्या दरामध्ये वाढ झाल्याने दिलासादायक वातावरण निर्माण झाले असताना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला साखरेचा भाव कोसळला आहे. यामुळे एकीकडे हंगामातील उत्पादन विक्रमाकडे वाटचाल करत असताना दुसरीकडे वित्तीय संस्था साखरेचे मूल्यांकन पुन्हा एकदा घटवण्याच्या तयारीत आहेत. साहजिकच, साखर उद्योगावर चिंतेचे ढग पसरले असून या स्थितीत साखरेच्या निर्यातीविषयी तातडीने पावले उचलली नाहीत, तर उद्योगाच्या गाड्याचे चाक पुन्हा एकदा खोलवर रुतू शकते.

भारतीय साखर उद्योगामध्ये हंगामाच्या प्रारंभी प्रतिक्विंटल साखर 3 हजार 600 रुपयांचा टप्पा ओलांडून पुढे गेली होती. तेव्हा साखर उद्योगात समाधानाचे वातावरण होते. या पार्श्‍वभूमीवर कारखानदारांनी उसाचा समाधानकारक दर मान्य केला आणि प्रथमच उसाच्या दरावरून निघणारे मोर्चे आटोक्यात आले. बाजारातील दरानुसार वित्तीय संस्थांनी क्विंटलला 3 हजार 500 रुपये मूल्यांकन जाहीर केले, पण हंगाम जसा सरकत गेला, तसे बाजारात साखर कोसळली. हा दर क्विंटलला 2 हजार 900 रुपयांपर्यंत खाली आल्याने साखर उद्योगाची भंबेरी उडाली. उत्पादकांना कबूल केलेली देणीही भागविता येत नाही, अशा अवस्थेत हा उद्योग आला आणि पाठोपाठ साखरेच्या हंगामातील उत्पादनाच्या फेरअंदाजाने कारखानदारांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. या पार्श्‍वभूमीवर केंद्राने गेल्या पंधरवड्यात निर्यातीसाठी काही पावले उचलण्यास सुरुवात केल्यानंतर साखर पुन्हा सरासरी 3 हजार 200 रुपयांच्या घरात पोहोचली आणि वित्तीय संस्थांनी साखरेचे मूल्यांकन क्विंटलला 2 हजार 970 रुपयांवरून 3 हजार 100 रुपयांपर्यंत वाढविल्याने उद्योगाला दिलासा मिळाला होता. परंतु, गेल्या चार दिवसांत साखर पुन्हा सरासरी 250 ते 300 रुपयांनी खाली घसरल्याने साखर उद्योगाच्या अडचणी वाढल्या आहेत.