Sat, Apr 20, 2019 17:51होमपेज › Kolhapur › उसाचं कांडं अन् दुधाच्या भांड्याला संघर्ष अपरिहार्यच?

उसाचं कांडं अन् दुधाच्या भांड्याला संघर्ष अपरिहार्यच?

Published On: Jul 23 2018 1:08AM | Last Updated: Jul 22 2018 11:20PMहमिदवाडा : मधुकर भोसले

ऊस असो, दूध निर्मिती असो की अन्य उत्पादने शेतीतून काढताना शेतकर्‍याला अपार  कष्ट उपसावे लागते. या कष्टाला कधीच शॉर्टकट नसतो. तरीही या कष्टाच्या घामाचे उचित दाम मिळत नाही हे दुर्दैवच आहे. उसाच कांडं व दुधाचं भांडं यासाठी संघर्ष जणू अपरिहार्य ठरला आहे. सरकार, संघ किंवा कारखानदार कधीच भांडल्याशिवाय देत नाहीत.

 पश्‍चिम महाराष्ट्र म्हणजे दूध व उसाचा पट्टा मात्र या दोन्हीसाठी गेल्या 17 - 18 वर्षांत वेळोवेळी कमालीचा संघर्ष करावा लागला. विशेष म्हणजे हा संघर्ष करताना प्रस्थपित राजकारणी किंवा आजी-माजी सत्ताधारी फारसे कधी रस्त्यावर उतरलेच नाहीत. जो टोकाचा संघर्ष केला व न्याय मिळवून दिला तोच मुळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हणजेच खा. राजू शेट्टी यांच्या लढण्याच्या भूमिकेमुळेच ! हीच लोकभावना सध्या दूध आंदोलनाच्या यशानंतर शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे.

एकीकडे जगाचा पोशिंदा म्हणायचे व दुसरीकडे याच शेतकर्‍याला पिळायचे ही इथली यंत्रणा. एकीकडे प्रचंड राबायचे व दुसरीकडे चांगल्या भावाची सदैव वाट पहायची व सातत्याने रस्त्यावर संघर्षच करत रहायचा का? असा प्रश्‍नदेखील या शेतकर्‍यांमधून पुढे येत आहे. अशावेळी कोल्हापूर जिल्ह्यातून दीड दशकांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ऊस आंदोलनाला प्रारंभ झाला. इतर नोकरदार व व्यावसायिकांचे मोर्चे काढणे सोपे असते मात्र, शेतकर्‍यांना संघटित करणे हे एक दिव्यच असते. त्यातही अन्य संप किंवा आंदोलनात नुकसान सरकारचे किंवा संबंधित विभागाचे (शाळा, एसटी वगैरे) होत असते व शेतकरी संपात मात्र नुकसान शेतकर्‍यांचेच अधिक होते. मात्र, अशाही काळात काही प्रमाणात नुकसान होऊ दे, पण तग धरा, पुढे त्याची भरपाई होणार आहे हा विश्‍वास खा. शेट्टी यांनी ऊस आंदोलनातून जागवला व नंतरच्या तोडग्यातून त्यांनी हे सिद्ध पण करून दाखवले. 300 ते 400 रुपयांवरून 3 हजारांवर ऊस दर जाण्याच्या प्रवासात अन्य संघटना, डावे पक्ष ,काही पक्ष यांच्या आंदोलनाचा जरी अंतर्भाव असला तरी यामध्ये ठळकपणे संघर्ष पुढे आला तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेच, अशी भावना शेतकरी स्पष्ट बोलताहेत. 

ऊस आंदोलनाच्या वेळी तर अनेकदा खा. शेट्टी यांचा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, जिद्दी शेट्टी यांनी संघर्ष करीत तर कधी कै. सदाशिवराव मंडलिक यांच्यासारख्या नेत्याशी संवाद साधत आंदोलनाची हवा टिकवली व सन्मानानेच आंदोलन थांबवले. ऊस आंदोलनापेक्षा देखील दूध आंदोलन हे एक दिव्यच! कारण दूध हा कमालीचा नाशिवंत घटक व अशावेळी गायीच्या दूध दरात झालेली कपातीची टायमिंग साधत खा. शेट्टी यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले अन् यशही मिळविले.