Fri, Jul 19, 2019 07:43होमपेज › Kolhapur › खोडवं फुटून आलं तरी बिलाचा पत्ता नाही!

खोडवं फुटून आलं तरी बिलाचा पत्ता नाही!

Published On: Feb 07 2018 2:23AM | Last Updated: Feb 07 2018 2:23AMमडिलगे बुद्रुक : मारुती घाटगे

यावर्षी साखर कारखाने सुरू होऊन 3 महिन्यांपर्यंतचा कालावधी  संपत आला आहे. परंतु, तुटून गेलेल्या उसाची बिले अजूनही बहुतांशी साखर कारखान्यांनी दिली नसल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्‍त होत आहे. लवकरात लवकर ही बिले जमा व्हावीत, अशी मागणी होत आहे. 

ग्रामीण भागामध्ये सुरू झालेल्या यात्रेच्या काळात बिले नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. ग्रामीण भागात फेब्रुवारी महिन्यात होत असलेल्या ग्रामदैवतांच्या यात्रा, या सर्व सणासाठी आर्थिक (पैशाची) गरज फार महत्त्वाची असते. यात्रेमध्ये पै-पाहुणे, माहेरवाशीनी, देवीची ओटी, जेवणाचा यथेच्छ कार्यक्रम असतो. या काळामध्ये अजून बहुतांशी साखर कारखान्यांची बिले जमा केलेली नाहीत. त्यामुळे पुन्हा ऊस तुटून खोडवं आलं तरी बिलाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची स्थिती केविलवाणी झाली आहे.  

नुकत्याच झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी पुढील हप्ता 2500 देण्याचा ठरविला आहे. ठरलेल्या दरापेक्षा 500 ते 600 दर घसरल्याने पुन्हा अवघड जागेचे दुखणे अशी स्थिती निर्माण झाली आहे. याचा विचार करून शासनाने साखर कारखान्यांना अनुदान देणे गरजेचे आहे. अन्यथा, ग्रामीण भागातील जवळ-जवळ 75 टक्के लोकांच्या उदरनिर्वाहतेचा प्रश्‍न निर्माण होईल. सध्या वाढत चाललेली महागाई आणि शेती पिकासाठी लागणार्‍या खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने कारखान्यांनी आठ दिवसांत खात्यावर ऊस बिलाची रक्‍कम जमा करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.