Sat, Jul 20, 2019 10:38होमपेज › Kolhapur › ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात

ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात

Published On: Mar 01 2018 1:39AM | Last Updated: Feb 28 2018 11:54PMसुळकूड : वार्ताहर

साखर कारखान्यांचे चालू गळीत हंगामातील अखेरचे सत्र सुरू झाले आहे. बहुतांश कारखान्यांचा हंगाम मार्च अखेर संपण्याची शक्यता आहे. अपवादात्मक कारखान्याचे एप्रिलच्या पहिल्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत गाळप करण्याची शक्यता आहे. दरम्यान, उन्हाळ्याचे कडक वातावरणही तापण्यास प्रारंभ झाल्यामुळे ऊस तोडीवर परिणाम होत आहे. अशा स्थितीत ऊस वजनातील घट रोखण्याचे आणि शेतजमीन रिकामी करून घेण्याचे लक्ष्य शेतकरी वर्गासमोर असल्याने शिल्लक ऊस शेतकरी वर्गासमोर असल्याने शिल्लक ऊस गळीतास पाठविण्यासाठी शेतकरी वर्गाची धांदल सुरू आहे. 
बहुतांश साखर कारखाने को - 265 ऊस वाणास तोडणी क्रमपाळीत शेवटी स्थान देत असल्यामुळे या जातीचा ऊस काही गावांतून अद्याप शिल्लक आहे. तर बहुतांश लागण उसाचे गळीत संपल्याने, खोडवा- निडवा उसाचे गाळप आता सुरू आहे. सर्वच वाणांना आता तुरे सुटले असून त्यांच्या वजनात घट येत आहे. उलटपक्षी ऊस गाळपास विलंब झाल्याने रिकव्हरी मात्र जादा येत असल्याने कारखान्यांच्या दृष्टीने ही बाबत फायदेशीर आहे. 

कारखान्यांच्या तोडणी क्रमपाळी यादीत खोडवा उसाचे क्षेत्र दिसत असले तरी, बर्‍याच शेतकर्‍यांनी गळीत हंगामाच्या पहिल्या सत्रातच अन्य कारखान्यांना हा ऊस दिल्याने बर्‍याच कारखान्यांच्या यादीत हे पोकळ क्षेत्रच शिल्लक आहे. गेल्या दशकभरात, जिल्ह्यात ऊस हेच प्रमुख पीक बनल्याने ऊसक्षेत्रात पुन्हा-पुन्हा ऊस पीक घेण्याचे सत्र नियमितपणे सुरू आहे. परिणामी अशा जमिनीत कायम ओलावा राहून जमिनीस वाफसाच येत नाही. अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी ऊस तुटून गेलेल्या जमिनीची नांगरट व पूर्ण मशागत करून उन्हाळ्यात ती पूर्णपणे वाळल्यास, आगामी आडसाली लागणीच्या दृष्टीने वाफसा येण्यास पूरक ठरणार असल्याने शेतकरी वर्ग त्या क्षेत्रातील ऊस लवकरच गळितास पाठवून मशागतीसाठी शेती मोकळी करून घेण्यासाठी सध्या प्रयत्नशिल आहे.
बहुतांश कारखान्यांनी दैनंदिन गाळप क्षमतेत वाढ केल्याने, यंदाचा गळीत हंगाम कमी वेळेत संपत आहे. तथापि यंदा प्रथमच प्रतिटन रु. 3 हजारांच्या आसपास पहिली उचल शेतकरी वर्गास मिळत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सीमावर्ती भागातील बर्‍याच शेतकर्‍यांनी गळीत हंगामाच्या सुरुवातीस खोडवा ऊस गळितास पाठवून त्या क्षेत्रात ऊस लागण केल्याने पुढील हंगामात ऊसक्षेत्र वाढण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, त्यातही साखर दराच्या कारणाने पहिल्या उचलीत केलेली 500 रुपयांची कपात ऊस उत्पादकांना आर्थिक अडचणीची अशीच आहे.