Fri, May 24, 2019 08:36होमपेज › Kolhapur › सरकारी शाळेतील पोरं हुश्शार!

सरकारी शाळेतील पोरं हुश्शार!

Published On: May 30 2018 2:18AM | Last Updated: May 30 2018 12:47AMकोल्हापूर : प्रवीण मस्के

खासगी शाळांचे भरमसाट पेव फुटले असले तरी जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी खासगी अनुदानित शाळांच्या विद्यार्थ्यांपेक्षा गुणवत्तेत हुश्शार असल्याचे ‘एनसीआरटीई’ने केलेल्या ‘नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे’तून (एनएएस) स्पष्ट झाले आहे. विविध विषयांमध्ये या शाळांची गुणवत्ता 3 ते 15 टक्क्यांनी जास्त असल्याचे समोर आले आहे. 

मोडकळीस आलेल्या शाळा, शिक्षकांची कमतरता, पटसंख्या कमी असे चित्र जिल्हा परिषद व मनपा शाळांमध्ये पहायला मिळत असल्याने पालकांकडून नेहमी तक्रार असते. जि.प., मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना लिहिता-वाचता येत नाही, शाळांमध्ये गुणवत्ता नसल्याने खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी पालकांचा कल दिसतो. शहरासह गामीण भागात अनेक खासगी शाळा सुरू झाल्या आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी मागे राहू नये, यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. 

 नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग (एनसीईआरटी) च्या वतीने शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे नोव्हेंबर 2017 मध्ये राष्ट्रीय संपादणूक चाचणी घेऊन विद्यार्थ्यांचा सर्व्हे करण्यात आला. रँडम पद्धतीने शाळांची निवड करण्यात आली. यात जिल्ह्यातील तिसरी (61), पाचवी (61) व आठवी (51) असे मिळून 173 शाळांचा समावेश होता. खासगी अनुदानित शाळा आणि शासनातर्फे जि.प. व मनपाच्या शाळांमधील तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची मराठी, गणित, परिसर अभ्यास व आठवीच्या विद्यार्थ्यांची मराठी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र  विषयांची गुणवत्ता तपासण्यात आली. ‘एनसीआरटीई’ कडून सर्व्हेचा अहवाल जाहीर केला आहे. यात जिल्हा परिषद व मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची टक्केवारी जास्त असल्याचे दिसून आले आहे.

शिक्षण विभागाकडून राबविल्या जात असलेल्या उपक्रमांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये खासगी शाळांच्या तुलनेत गुणवत्तेत वाढ झालेली दिसून येते. जि.प. व मनपा शाळांचा सुधारलेला गुणात्मक दर्जा भविष्यात आशावादी चित्र निर्माण करेल. 

- सुभाष चौगुले प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प.