Tue, Jul 16, 2019 09:48होमपेज › Kolhapur › दबाव झुगारून विद्यार्थी, पालक रस्त्यावर

दबाव झुगारून विद्यार्थी, पालक रस्त्यावर

Published On: Mar 14 2018 12:52AM | Last Updated: Mar 13 2018 10:21PMकोल्हापूर : प्रतिनिधी

‘शिक्षण वाचवा, देश वाचवा’,  शिक्षणाचे कंपनीकरण रद्द करा..’ अशा घोषणा देत शहरातील शाळांमधील हजारो विद्यार्थी व पालकांनी मंगळवारी रस्त्यावर उतरत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रशासन व पोलिसांचा दबाव झुगारून दडपशाही हाणून पाडली. विद्यार्थ्यांनी प्रमुख रस्त्यावर प्रतिज्ञा व राष्ट्रगीत म्हटले. यामुळे शहरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली. या आंदोलनात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. प्रत्येक शाळेत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

सरकारी शाळा बंद व खासगी कंपन्यांना शाळा सुरू करण्यास परवानगी देण्याच्या शासनाच्या धोरणाविरोधात शिक्षण वाचवा नागरी कृती समितीतर्फे जनआंदोलन सुरू आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता मुक्‍त सैनिक वसाहत येथील वालावलकर हायस्कूल प्रशालेतील सुमारे 800 विद्यार्थी व पालकांनी ताराराणी चौक ते तावडे हॉटेल मार्गावर उभे राहून शासनाविरोधी घोषणा देत प्रार्थना व राष्ट्रगीत म्हटले. जाधववाडी मार्केट यार्ड परिसरातील शाळेतील हजारो विद्यार्थी, पालकांनी मुख्य रस्त्यावर घोषणाबाजी करीत निदर्शने केली. यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. दसरा चौकात नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी परिपाठ आंदोलन केले. गणी आजरेकर, रफीक शेख, रफीक मुल्ला, कादर मलबारी आदी सहभागी झाले होते. 

मध्यवर्ती बसस्थानक परिसरात विक्रम हायस्कूलचे विद्यार्थी व कसबा बावडा रोडवरील शुगरमील रस्त्यावर परिसरातील शाळांमधील विद्यार्थी, पालक व नगरसेवक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्याने वाहतूक विस्कळीत झाली. दुपारी बाराच्या सुमारास पद्माराजे हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी शासनाच्या अन्यायी धोरणाचा निषेध करीत भररस्त्यात आंदोलन केले.  महाराष्ट्र हायस्कूल व स. म. लोहिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी परिपाठ आंदोलनात सहभाग घेतला. पाचगाव, कळंबा रोड, कसबा बावडा, शिवाजी पेठ येथील शाळांमधील विद्यार्थ्यांनी परिपाठ आंदोलनात सहभागी होऊन शासन व पोलिस प्रशासनाचा निषेध केला. आंदोलनात कृती समितीचे अशोक पोवार, भरत रसाळे, वसंतराव देशमुख, राजेश वरक, रमेश मोरे, लालासाहेब गायकवाड, सी. एम. गायकवाड, कॉ. राजू लाटकर, नगरसेवक अशोक जाधव आदी सहभागी झाले होते.

शाळांचे कंपनीकरण थांबवा, यासह अन्य शैक्षणिक मागण्यांसाठी साने गुरुजी वसाहत परिसर शाळांमधील विद्यार्थी, पालकांनी  रस्त्यावर उतरून सामुदायिक प्रतिज्ञा आणि राष्ट्रगीत म्हटले. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. कोल्हापूर-राधानगरी रोड  तासभर रोखल्यानेे वाहतुक कोंडी झाली.  सकाळी 11.30  वाजता  देशमुख हायस्कूलचे संस्थापक-अध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तलवार चौकात पालक आणि  विद्यार्थी एकत्र जमले. राधानगरी रोडवर ‘शिक्षण आमच्या हक्‍काचे, नाही कोणाच्या बापाचे, शाळांचे कंपनीकरण बंद करा’, अशा घोषणा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा  व राष्ट्रगीत गायले. 

यावेळी नगरसेवक शारंगधर देशमुख, मच्छिंद्रनाथ देशमुख, सुनील कुरणे यांच्यासह पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोल्हापूर-राधानगरी रोडवरील सानेगुरुजी वसाहत चौक येथे सिद्धेश्‍वर प्रासादिक, गोविंदराव पानसरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. आंदोलनात शिक्षक नेते प्रभाकर आरडे, अनिल चव्हाण सहभागी झाले होते. कदमवाडी येथील माझी शाळा, जाधववाडी शाळा व टेंबलाई विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनीही आंदोलनात सहभाग घेतला.

मुख्याध्यापकांना नोटीस

शिक्षकांच्या आंदोलनात मुलांना सहभागी करुन घेऊ नये, असे स्पष्ट आदेश जिल्हा परिषद व महापालिका शिक्षणाधिकार्‍यांनी मुख्याध्यापकांना काढले होते. याचे उल्‍लंघन झाल्यास पोलिसांमार्फत फौजदारी कारवाई केली जाईल, अशा सुचनाही सोमवारी दिल्या होत्या. तरीही मंगळवारी मुलांना आंदोलनात उतरवले गेल्याने याची शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली आहे. सहभागी शाळा व मुलांची छायाचित्रासह माहिती संकलीत करुन तातडीने मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

शिक्षण वाचवा नागरी समितीच्या वतीने मंगळवारी शहरात आंदोलन केले. त्यात शिक्षकांनी पालक व विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेत प्रार्थना, प्रतिज्ञा व राष्ट्रगीत म्हणवून घेतले गेले. अशाप्रकारे मुलांना सहभागी करुन घेऊ नये, याबाबत शिक्षण विभागाने सोमवारीच सुचना दिल्या होत्या. सुचना देताना शिक्षण घेणारी मुले अल्पवयीन असल्याने त्यांना अशा आंदोलनात सहभागी करुन घेणे, त्यांना सहभागासाठी प्रवृत्त करणे हे बालकासंबंंधी असलेल्या विविध कायद्यांच्या तरतुदींचा भंग करणारे आहे. त्यामुळे फौजदारी दंड प्रक्रिया अधिनियम कलम 149 अन्वये  मुलांना सहभागी करुन घेतल्याबद्दल कायदा व सुव्यवस्था भंग केली म्हणून दखलप्राप्‍त गुन्हा समजून कायदेशीर कारवाई सुरु केली जाईल असे पोलिसांकरवी मुख्याध्यापकांना कळवले होते. तरीदेखील मंगळवारी मुलांना आंदोलनात उतरवले गेले. सोबत पालकांनाही घेतले गेले. याची दखल घेत जि.प प्राथमिक व माध्यमिक आणि महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाने आपली कांही अधिकारी या आंदोलनात पाठवून आंदोलनस्थळाचे चित्रीकरण केले आहे. संध्याकाळी याचे संकलन करुन संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस काढण्यास सुरुवात झाली. त्यांचा खुलासा आल्यानंतर फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरु आहे. 

सारवासारव की पळवाट !

मुलांना सहभागी करुन घेण्यावरुन शिक्षण विभागाने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापकांकडून पळवाट शोधण्यास सुरुवात झाली आहे. मुलांना आम्ही सहभागी करुन घेतले नाही. शाळा सुटल्यानंतर ते परस्पर आंदोलनात आले, अशी आता शाळांकडून सारवासारव सुरु झाली आहे. त्यामुळे आता शिक्षणाधिकारी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.