सरवडे : वार्ताहर
कोल्हापूर-गारगोटी रोडवर तपोवन परिसरात झालेल्या अपघातात आकनूर (ता.राधानगरी) येथील कु. नीलेश धनाजी चव्हाण (वय 17) या विद्यार्थ्याचा दुचाकीवरून पडून मृत्यू झाला.
कु. नीलेश हा कळंबा येथील आय.टी.आय.मध्ये शिक्षण घेत आहे. सकाळी कॉलेज आटोपून काही कामानिमित्त आपल्या मित्राकडे दुचाकीवरून कोल्हापूर-गारगोटी रोडने जात असताना कळंबा तपोवन एलोरा फरशीजवळ त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला. दुचाकीवरून तो रस्त्यावर आपटल्याने गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला नातेवाईक व मित्रांनी तत्काळ दवाखान्यात हलवले.
मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. अतिरक्तस्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या मृत्यू झाल्याचे समजताच दवाखाना परिसरातील आई-वडील, नातेवाईक व मित्रांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्याच्या पश्चात आई-वडील, आजी, चुलता, चुलती, बहीण, भाऊ असा परिवार आहे.