Thu, Feb 21, 2019 07:48होमपेज › Kolhapur › मित्रासाठी धावला अन् जिवाला  मुकला!

मित्रासाठी धावला अन् जिवाला  मुकला!

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 12 2018 12:36AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

निमित्त होतं... अंथरूणावर लोळल्याचं... क्षुल्लक कारणातून दंगामस्ती, शिवीगाळ, मारामारी झाली... तिघंही एकाच वर्गातले... अल्पवयीन... दोन मित्रांतल्या झटापटीत शंकर धावला... मध्यस्थीचा प्रयत्न केला; पण त्यालाच श्रीमुखात लगावल्याने प्रत्युत्तरादाखल त्यानंही कानाखाली आवाज काढला...संतापलेल्या वर्गमित्राने सारी ताकद एकवटून छातीवर ठोसा लगावला... अवघ्या क्षणात शंकर सावळाराम झोरे (वय 17, रा. अंबाईवाडा, ता. शाहूवाडी)  हा कॉलेज युवक कोसळला तो कायमचाच...

मित्राच्या मदतीला धावला अन् स्वत:च्या जिवाला मुकल्याची मन हेलावणारी घटना रजपूतवाडी येथील महात्मा जोतिबा फुले कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या वसतिगृहात घडली. अकरावीत शिक्षण घेणार्‍या 17 वर्षीय मित्रानेच ठोसा लगावल्याने शंकरचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री ही घटना घडली.  करवीर पोलिसांनी बाल संशयिताला अटक केली आहे. त्याची बालसुधारगृहात रवानगी झाली आहे. चेष्टामस्करी, खोलीत पांघरलेल्या अंथरूणावर लोळल्याच्या कारणातून गरीब घरातील, हाता-तोंडाला आलेल्या युवकाच्या मृत्यूने झोरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला...

शंकर अंबाईवाडीचा, तर बालसंशयित तळेवाडी (ता. आटपाडी) गावचा... दोघांच्याही घरची आर्थिक स्थिती गरिबीची...दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी आश्रमशाळेत प्रवेश घेतला. शंकर, संशयित, मित्र असे तिघे जण नेहमीच एकत्र असायचे...संशयिताचा भलताच पारा चढला...

बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर संशयिताने फरशीवर अंथरूण टाकले. त्यावर शंकरचा मित्र लोळू लागला. त्यामुळेे संशयिताचा पारा चढला. रागाने शिवराळ भाषा वापरल्याने मित्रालाही भलताच राग आला. त्यांच्यात झटापट सुरू झाली. पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. बाल संशयिताला ताब्यात घेतले. क्षुल्लक कारणातून हाता-तोंडाला आलेल्या मुलाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्‍त होत आहे.