Thu, Jun 27, 2019 16:48होमपेज › Kolhapur › भवानी मंडप परिसरात मारहाणीत विद्यार्थी जखमी

भवानी मंडप परिसरात मारहाणीत विद्यार्थी जखमी

Published On: Mar 04 2018 1:43AM | Last Updated: Mar 04 2018 12:13AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

किरकोळ वादातून तरुणांच्या टोळक्याने केलेल्या मारहाणीत अजीज मफीजूल मलिक (वय 17, रा. बालाजी पार्क, जरगनगर) जखमी झाला. बारावीचा पेपर संपवून तो शाळेतून बाहेर पडत असतानाच भवानी मंडप परिसरात ही मारहाण करण्यात आली. भांडण सोडविताना अजीजची आई परवीन मलिक (वय 39) यादेखील किरकोळ जखमी झाल्या. 

अजीज मलिक याच्या वडिलांचे घर आझाद गल्लीमध्ये आहे. तो बालगोपाल तालीम मंडळाचा कार्यकर्ता आहे. बुधवारी (दि. 28) त्याचे बाराईमाम परिसरातील मुलांसोबत भांडण झाले होते. भागातील ज्येष्ठांनी गुरुवारी हे भांडण मिटवले होते. 

अजीज इयत्ता बारावीत शिकतो आहे. शनिवारी अजीज एमएलजी हायस्कूलमधून पेपर सोडवून बाहेर पडताच तरुणांच्या एका टोळक्याने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याची आई परवीन सोडविण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. 

परिसरातील नागरिकांनी हे भांडण सोडवून जखमींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम राजवाडा पोलिसांत सुरू होते.