Sun, Aug 18, 2019 14:55होमपेज › Kolhapur › साडेचार हजार विद्यार्थ्यांचे अद्याप बँक खातेच नाही

साडेचार हजार विद्यार्थ्यांचे अद्याप बँक खातेच नाही

Published On: May 05 2018 12:50AM | Last Updated: May 04 2018 11:02PMकोल्हापूर : प्रवीण मस्के

सरकारी अनुदान वाटपात होणारा गैरव्यवहार रोखण्यासाठी प्राथमिक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे बँकेत खाते काढून त्याद्वारे गणवेश निधीचे पैसे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गतवर्षी राज्य सरकारने घेतला. मात्र, जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील सुमारे 4,933 विद्यार्थ्यांचे बँक खाते अद्याप उघडले नसल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाच्या जानेवारी अखेरच्या अहवालानुसार समोर आली आहे. 

रोखीचे व्यवहार कॅशलेस करण्यावर केंद्र व राज्य सरकारने भर दिला आहे. प्राथमिक शिक्षण घेणार्‍या 1 ली ते 8 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेशासाठी सरकारकडून मिळणारे अनुदान रोखीने न देता त्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. प्रत्येक विद्यार्थ्यास दोन गणेवश संचासाठी 400 रुपये दिले जातात.  

 शासनाच्या 14 व 29 डिसेंबर 2017 च्या पत्रानुसार विद्यार्थ्यांचे बँक खाते नसेल तर गणवेश निधीचे पैसे पालकांच्या बँक खात्यावर आणि दोघांचे बँक खाते नसेल तर धनादेशाद्वारे गणवेश निधीचे पैसे वाटप करण्यात यावे, अशा सूचना आहेत. त्यानुसार शाळास्तरावर कार्यवाही करण्यात आली. पण, नवीन शैक्षणिक सुरू होत आले तरी अद्यापही साडेचारहून अधिक विद्यार्थ्यांचे बँकेत खाते उघडलेले नाही. शाळांना 31 मार्चची मुदत देण्यात आली होती. ज्या शाळा येत्या शैक्षणिक वर्षापर्यंत विद्यार्थ्यांची शंभर टक्के बँक खाती उघडणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले.