Thu, Jul 18, 2019 06:21होमपेज › Kolhapur › स्वच्छतेसाठी शाळेत ‘विद्यार्थी राजदूत’

स्वच्छतेसाठी शाळेत ‘विद्यार्थी राजदूत’

Published On: Aug 18 2018 1:01AM | Last Updated: Aug 18 2018 12:46AMकोल्हापूर : प्रवीण मस्के

‘स्वच्छता हे काम नसून ती एक चांगली सवय  आहे,’ हे आता शाळकरी विद्यार्थी सांगणार आहेत. स्वच्छ भारत पंधरवड्यांतर्गंत ‘विद्यार्थी राजदूत’ म्हणून स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2019पर्यंत स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत स्वच्छ भारताचे ध्येय ठेवले आहे. त्यानुसार शिक्षण व साक्षरता विभागाच्या वतीने सर्व माध्यमांच्या प्राथमिक  व माध्यमिक शाळांमध्ये स्वच्छ भारत पंधरवडा साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील महापालिका, प्राथमिक व माध्यमिक अशा सुमारे तीन हजार शाळांमध्ये पंधरवड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शाळा व शिक्षण संस्थांमधील लाखो विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी पंधरवड्यात दररोज सकाळी शाळेत स्वच्छतेची शपथ घेणार आहेत. 

शालेय विद्यार्थांसह शिक्षक व पालकांसाठी चित्रकला, वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर स्वच्छतेच्या जागरूकतेविषयीचे संदेश शाळा व शिक्षण संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबरोबरच स्वच्छतेसंदर्भातील छायाचित्रे प्रकाशित केली जाणार आहेत. शिक्षक व शाळा व्यवस्थापनांकडून विविध उपकम हाती घेण्यात येणार आहेत. जुने अभिलेख असलेले कागदपत्रे काढून टाकण्यात येतील. शाळा परिसरातील मोडके टाकाऊ सामान असलेले मोडके फर्निचर, निरुपयोगी उपकरणे, नादुरुस्त वाहने पूर्णत: बाजूला काढून टाकावीत. शिक्षक, विद्यार्थांनी जवळील नागरी वस्तीत जाऊन ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याविषयी जनजागृती करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

स्वच्छ भारत पंधरवडा राबविण्याबाबत सर्व शाळांना परिपत्रक पाठवून सूचना देण्यात आल्या आहेत. 1 ली ते 12 वीपर्यंत लाखो विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील. स्वच्छता पंधरवडा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
- डी. एस. पोवार, शिक्षण उपनिरीक्षक