Fri, Apr 26, 2019 09:42होमपेज › Kolhapur › कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा उपसंचालक कार्यालयावर मोर्चा

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा उपसंचालक कार्यालयावर मोर्चा

Published On: Jan 19 2018 1:51AM | Last Updated: Jan 18 2018 11:36PMकोल्हापूर : प्रतिनिधी

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या न्याय व प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी पाच जिल्ह्यांतील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी गुरुवारी  विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. 

वर्षभर आंदोलने करूनही शासनाने बारावी परीक्षेपूर्वी मागण्यांची पूर्तता न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा शिक्षक संघातर्फे देण्यात आला आहे. राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या आदेशानुसार शासनाला दिलेल्या वचनांची आठवण करून देण्यासाठी आंदोलनाचे टप्पे सुरू आहेत. त्यानुसार आज कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी मोर्चा काढला. टाऊन हॉल बागेपासून मोर्चास सुरुवात झाली. दसरा चौक, अयोध्या चित्रमंदिर, बिंदू चौक, महापालिका, लुगडी ओळ मार्गे शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर मोर्चाची सांगता झाली. मे 2012 नंतर नियुक्त शिक्षक मान्यतेसाठी एप्रिल 2017 मध्ये कॅम्प घेऊनही अद्याप मान्यता न झाल्याने शिक्षक विनावेतन राबत आहेत. 28 हजारांपेक्षा जास्त शिक्षक शासकीय वेतनापासून वंचित आहेत.  अर्धवेळ शिक्षकांचे वेतन अखंडितपणे मिळत नाही, त्यांना पेन्शन व इतर लाभ मिळाले पाहिजेत. नोव्हेंबर 2005 पूर्वी व नंतर टप्पा अनुदान व अनुदानावर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे. मान्यताप्राप्त शिक्षकांची नावे शालार्थमध्ये समाविष्ट झाली पाहिजेत.  आंदोलनात राज्य कार्याध्यक्ष प्रा. अविनाश तळेकर, प्रा. सुरेश देसाई, प्रा.ए.बी.ऊरणकर, प्रा.दिलीप शितोळे यांच्यासह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक सहभागी झाले होते.