Thu, Mar 21, 2019 23:22
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › विनाअनुदानित शिक्षकांचे अधीक्षक कार्यालयास कडी लावून आंदोलन 

विनाअनुदानित शिक्षकांचे अधीक्षक कार्यालयास कडी लावून आंदोलन 

Published On: Jan 19 2018 1:51AM | Last Updated: Jan 18 2018 11:38PMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील 20 टक्के अनुदानपात्र शाळांमधील शिक्षकांचे सप्टेंबर 2017 पासून वेतन न काढल्याने गुरुवारी (दि.18) विनाअनुदानित शिक्षकांनी वेतन पथक अधीक्षक कार्यालयास बाहेरून कडी लावून धरणे आंदोलन केले. निवेदन स्वीकारण्यास कोणीच न आल्याने शिक्षकांनी निषेध व्यक्त केला. 

राज्यातील अनेक शाळांचे पगार नियमित होत नसून प्रत्येकवेळी वेगळी कारणे सांगितली जातात. निधी उपलब्ध असताना पगार वेळेवर दिले जात नाहीत. जिल्ह्यातील 20 टक्के अनुदानित शाळांचे सप्टेंबर 2017 पासून अद्याप वेतन झालेले नाही. यामुळे शिक्षकांवर पुन्हा उपासमारीची वेळ आली आहे. शासन वेळकाढूपणा करीत आहे. मागील सर्व वेतन मिळण्यासाठी ब्रोकन पिरीयड मंजूर करावा. अन्यथा 26 जानेवारीपासून शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी कार्यालय, वेतन पथक अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनात राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, सचिव प्रकाश पाटील, गजानन काटकर यांच्यासह विनाअनुदानित शिक्षक सहभागी झाले होते.