होमपेज › Kolhapur › अमृत योजनेसाठी आज इचलकरंजीत महामोर्चा

अमृत योजनेसाठी आज इचलकरंजीत महामोर्चा

Published On: May 14 2018 1:41AM | Last Updated: May 14 2018 12:09AMइचलकरंजी : प्रतिनिधी

इचलकरंजीच्या ‘अमृत’ योजनेला वारणाकाठवरील गावांचा विरोध होऊ लागल्याने इचलकरंजीकरांनीही योजना व्हावी, यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले असून त्याचे पहिले पाऊल म्हणून सोमवारी (दि.14) ‘इचलकरंजी बंद’ची हाक देण्यात आली आहे. सर्व व्यवहार बंद ठेवून प्रांत कार्यालयावर निघणार्‍या महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन सर्वपक्षीयांनी केल्याने सोमवारी वारणा योजनेसाठी इचलकरंजीकर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतील, असे वातावरण आहे. या आंदोलनातून पाण्यासाठी शहरवासीयांची एकजूट वारणाकाठला दाखवून देण्याचा आणि या आंदोलनाची दखल सरकारला घेण्यास भाग पाडण्याचा निर्धार सर्व इचलकरंजीकरांनी केला आहे.

दरम्यान, स्वच्छ व मुबलक पाणी मिळवणे हा इचलकरंजीच्या नागरिकांचा हक्‍क आहे. मंजूर झालेली वारणा योजना पूर्ण करण्यासाठी आम्ही इचलकरंजीकर कृती समितीच्या वतीने सोमवारी (दि.14) पुकारण्यात आलेल्या इचलकरंजी बंदला शहरातील प्रत्येक नागरिकांनी प्रतिसाद द्यावा. मध्यवर्ती बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून प्रांत कार्यालयावर निघणार्‍या महामोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्षा अ‍ॅड. सौ.अलका स्वामी यांनी केले आहे. ‘उद्या नाही तर कधीच नाही’ हा विचार घेऊन सर्वांनी एकत्र येऊन बंद आंदोलन यशस्वी करावे, अशी हाकही त्यांनी दिली आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. 15) पासून नगरसेवक आणि नगरसेविका बेमुदत साखळी उपोषणास बसणार असल्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढतच जाणार आहे.

केंद्र शासनाने ‘अमृत’ योजनेतून इचलकरंजी शहरासाठी वारणा योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेचा ई-भूमिपूजनचा कार्यक्रम 13 एप्रिल 2017 मध्ये करण्यात आला होता. तब्बल एक वर्षापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ होऊनही अद्याप योजनेचे काम सुरू झालेले नाही. या योजनेला दानोळीसह वारणा काठच्या गावांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. या विरोधानंतर इचलकरंजीतील सर्वपक्षीय कृती समितीने सोमवारी (दि.14) इचलकरंजी बंदची हाक दिली आहे.

Tags : amrut water skim, warna river, ichalkarangi