होमपेज › Kolhapur › झूम प्रकल्प बंद करा; तावडे हॉटेलजवळ कचरा टाका

झूम प्रकल्प बंद करा; तावडे हॉटेलजवळ कचरा टाका

Published On: Apr 14 2018 1:42AM | Last Updated: Apr 14 2018 1:02AMकोल्हापूरः प्रतिनिधी 

कोल्हापूर शहरातील लाईन बझार येथे असलेल्या झूम कचर्‍याचा प्रकल्प बंद करण्यात यावा. गांधीनगर रोडवरील तावडे हॉटेलजवळ कचरा डेपोसाठी आरक्षित केलेल्या जागेवर कचरा टाकण्यात यावा, अशी आग्रही मागणी स्थायी समिती सभेत शुक्रवारी करण्यात आली. यावेळी स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांनी आपण स्थायी समिती सदस्यांच्या निर्णयाशी सहमत असल्याचे सांगितले. प्रतिज्ञा उत्तुरे, डॉ. संदीप नेजदार, दीपा मगदूम, प्रतीक्षा पाटील, भाग्यश्री शेटके, सविता घोरपडे आदींनी चर्चेत भाग घेतला. 

नगरसेवक रस्त्यावर उतरून कारवाई करतील...
तावडे हॉटेल परिसरातील बेकायदेशीर बांधकामे पाडायचे काय झाले? निर्णय जर शासन घेणार तर मग आम्ही कशाला निवडून आलो आहोत? महापालिकेच्या हितासाठी कारवाई करणे योग्य आहे का नाही? पोलिस संरक्षण कशाला पाहिजे? आम्ही सर्व नगरसेवक कारवाईसाठी अधिकार्‍यासोबत रस्त्यावर उतरू. जोपर्यंत तावडे हॉटेल परिसरात कारवाई होणार नाही तोपर्यंत शहरातील कुठल्याही अतिक्रमणास हात लावू देणार नाही. धनधांडग्यांना सोडून गरिबांवर अन्याय... असा कारभार महापालिकेच्यावतीने सुरु आहे, असा आरोपही सदस्यांनी सभेत केला. तसेच महापालिकेचा अतिक्रमण विभाग कायमचा बंद करा, अशी मागणीही केली. 

कारवाई न करण्यासाठी शासनाने लेखी आदेश दिला का?...
तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करू नये, असे लेखी आदेश राज्य शासनाने दिले आहेत का? नसेल तर मग तोंडी आदेश मान्य करायचा का? मुंबईतील बैठकीच्या इतिवृत्तांची प्रत द्या. यापूर्वी विनाबंदोबस्तात कारवाई केली. तुम्हाला कारवाई करायची नाही का, हे स्पष्ट सांगा. पुन्हा पोलिस बंदोबस्तासाठी पत्र दिले आहे का? पोलिस बंदोबस्त मिळाला नाही तर सर्व नगरसेवकांसह कारवाईला जाऊ. प्रशासनाने लेखी उत्तर द्यावे आम्ही पुढील कारवाई काय करायची ते पाहतो, असेही सदस्यांनी सांगितले.

आरक्षित जागा महापालिकेचीच...
प्रशासनाच्या वतीने तावडे हॉटेल पसिरात आरक्षित 3 ठिकाणी बांधकामे झालेली आहेत. 2014  पूर्वी सर्व्हे झाला होता. आता पुन्हा सर्व्हे झाला. 2014 पूर्वी बांधकामांना 10 आठवडे अपील मुदत दिली. 81 ब ची जनरल नोटीस 2013 ला दिली होती. ट्रक टर्मिनलची जागा संपादन करायची आहे. या जागेत 10 बांधकामे आहेत. कचरा डेपोच्या आरक्षित जागेवर 2 मिळकती आहेत. कचरा डेपोच्या जागेवर काही जागा ताब्यात आहे. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागेल. पोलिस बंदोबस्त मिळत नाही तोपर्यंत करवाई करता येत नाही. ट्रक टर्मिनल जागेलगतच्या रोडला लागून असलेली जागा ताब्यात नाही. उर्वरित जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही ठेवीत आहोत. आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल, असे स्पष्ट करण्यात आले. 

केएमटीकडील ठोक मानधनवरील वाहनचालकांना महापालिकेकडे वर्ग करा. अनेक वाहनचालक ग्रामीण भागातून येतात. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. केएमटीकडे तीन-चार  महिने पगार होत नाहीत, असे सदस्यांनी सांगितले. प्रशासनाच्या वतीने त्यांचा पगार महापालिकाच देते. संबंधित पगार महापालिका केएमटीकडे दर महिन्याला वर्ग करते. त्यानंतर त्यांना पगार मिळतो. त्यांची नियुक्ती केएमटीकडे असल्याने पगार केएमटीकडूनच काढावा लागतो, असे स्पष्ट करण्यात आले. शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट आहे. बंदोबस्त करा, अशी सूचना सदस्यांनी केली. महापालिकेच्या वतीने तीन दिवसांपासून कुत्र्यांचे निर्बीजीकरण सुरू केले आहे. यामध्ये कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाते, असे स्पष्ट करण्यात आले. 

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची जयंती आहे. त्यासाठी कोल्हापुरात ठिकठिकाणी समाजप्रबोधनासाठी फलक उभारण्यात येत आहेत; परंतु महापालिकेच्या वतीने हजारात कर आकारला जात आहे. ठराविक दिवसांसाठी महापुरुषांच्या जयंतीवेळीच हे फलक उभारले जात असल्याने त्यासाठी नाममात्र एक रुपया कर आकारून परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी स्थायी सभेत केली. त्यासंदर्भातील ठराव करून तो मंजूर करण्यात आला. 
 

 Tags : zoom project,  garbage, Tawde Hotel, kolhapur news