Wed, Jul 24, 2019 14:09होमपेज › Kolhapur › सोशल मीडियामुळे मिळाला चोरीला गेलेला डंपर

सोशल मीडियामुळे मिळाला चोरीला गेलेला डंपर

Published On: May 29 2018 1:38AM | Last Updated: May 28 2018 11:53PMटोप : वार्ताहर

हातकणंगले तालुक्यातील टोप येथील शिवाजी पाटील या युवकाचा चोरीला गेलेला डंपर अवघ्या काही तासांतच सोशल मीडियाच्या माध्यमातून सापडला. पाटील यांनी शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे घराशेजारी लावलेला डंपर मध्यरात्री चोरट्यांनी केबिनचे लॉक तोडून पळविला. रविवारी सकाळी डंपर चोरीला गेल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. त्यानंतर पाटील यांनी नातेवाईक, मित्र मंडळींना डंपरचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवले. तसेच डंपर चोरीला गेला असून, आढळल्यास संपर्कासाठीचे फोन नंबरही दिले. त्याचबरोबर एमआयडीसी शिरोली पोलिसांनाही चोरीच्या घटनेची माहिती दिली. किणी टोल नाका, सांगली फाटा, तसेच संभापूर-तासगाव रस्त्यावर तासगावमध्ये असणारे ग्रामपंचायतीचे सीसीटीव्ही फुटेज पाहण्यास सुरुवात केली.

दिवसभरात डंपर चोरीला गेल्याची पोस्ट कोल्हापूरसह शेजारील जिल्ह्यांतदेखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम सायंकाळी दिसून आला. सायंकाळी 6.30 वाजता शिवाजी पाटील यांच्या मोबाईलवर फोन आला व डंपर बुर्ली-आमनापूर (ता. पलूस, जि. सांगली) येथे असल्याचे समजले. त्यानंतर पाटील यांनी बुर्ली गावाकडे धाव घेतली असता, झुडपात डंपर सोडून दिल्याचे दिसून आले.