होमपेज › Kolhapur › त्यांनी पाच जणांशी लग्‍न करून सहाव्याशी संसार थाटला : खा. महाडिक यांची टीका

त्यांनी पाच जणांशी लग्‍न करून सहाव्याशी संसार थाटला : खा. महाडिक यांची टीका

Published On: Sep 04 2018 1:17AM | Last Updated: Sep 04 2018 12:55AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मी राष्ट्रवादीशी लग्‍न करून भाजपशी संसार थाटला म्हणणार्‍यांनी 2004 च्या विधानसभा निवडणुकीत पाच जणांशी लग्‍न करून सहाव्याशी संसार थाटला, अशा शब्दांत आज, सोमवारी राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी काँगे्रसचे आ. सतेज पाटील यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले. माजी आ. महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील, मालोजीराजे छत्रपती यांनी त्यांना मदत केली. त्यांच्याच पाठीत त्यांनी खंजीर खुपसला, असेही ते  म्हणाले. धनंजय महाडिक युवाशक्‍तीच्या वतीने सोमवारी दसरा चौकात दहीहंडीचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी आमदार पाटील यांनी आज पत्रकातून केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.

ते म्हणाले, या सूर्याजी पिसाळांना पैसा व सत्तेची मस्ती आली असून 2019 च्या निवडणुकीत जनताच त्यांची ही मस्ती जिरवेल.  शिशुपाल मनोरुग्ण होता म्हणून श्रीकृष्णाने त्याचे 99 गुन्हे माफ केले; पण शंभरावा गुन्हा केल्यानंतर त्याचे काय झाले हे सार्‍यांना माहिती आहे.

ते म्हणाले, त्यांनी कोल्हापूरची जागा मागितल्यानंतर त्यांनी पाठीत खंजीर खुपसणारा, रंग बदलणारा सरडा, अशी माझ्यावर टीका केली. भाजपचा माझा तसा संबंध नाही. सार्‍यांशीच माझे मित्रत्वाचे संबंध आहेत. 2004 च्या निवडणुकीत त्यांनी पाच जणांशी लग्‍न केले व सहाव्याबरोबर संसार केला. त्या पाच जणांमध्ये पिवळा, हिरवा, निळा, भगवा असे सारेच रंग होते. त्यामुळे रंग बदलणारे कोण आहेत, हे लोकांना माहीत आहे.

लोकसभेच्या निकालानंतर मी हसन मुश्रीफ यांच्या पायावर डोके ठेवले, असे त्यांनी सांगितले. मानसपुत्र म्हणवून घेणारे हे पूर्वी महादेवराव महाडिक यांच्या गाडीचा दरवाजा उघडत होते. 2004 साली निवडणुकीत विजयी झाल्यानंतर या मानसपुत्राने महाडिक यांच्या पायावर चक्‍क लोटांगण घातले होते. आज त्याच महाडिकांच्या पाठीत खंजीर खुपसणारे आता माझ्यावर खंजीर खुपसल्याची टीका करत आहेत. 2009 च्या निवडणुकीत मला उमेदवारी मिळू नये म्हणून त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यावेळी संभाजीराजे निवडून आले असते, तर आम्ही निवडून आणले म्हणून सांगत सुटले असते; पण संभाजीराजे पराभूत झाल्याचे खापर ते महाडिकांवर फोडत आहेत, असा टोलाही महाडिक यांनी लगावला.

कमी वयात त्यांना आमदारकी, मंत्रिपद मिळाले. त्या पदांचा उपयोग त्यांनी विकासकामे करण्याऐवजी कुणाला आत टाक, जमिनी हडप करण्यासाठी, अन्याय करण्यासाठीच केला. त्यांचे तोंड उघडले की ते जयंती नालाच वाटते. त्यांनी कोल्हापूरकरांवर आयआरबी व थेट पाईपलाइन हे दोन मोठे उपकार केले आहेत. त्यांच्या या कामामुळेच जनतेने त्यांना हद्दपार केले आहे, असे ते म्हणाले.

हे बाळ गुणी आहे

त्यांच्या वडिलांनीच अलीकडे त्यांना भाजपमध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे, हे बाळ गुणी आहे, त्यांना विचार करूनच संधी द्या, असे ते आ. हाळवणकर यांना उद्देशून म्हणाले.