Fri, Aug 23, 2019 14:59होमपेज › Kolhapur › राधानगरी अभयारण्यात सुरू झाली पुन्हा प्राणीगणना

राधानगरी अभयारण्यात सुरू झाली पुन्हा प्राणीगणना

Published On: Feb 16 2018 1:52AM | Last Updated: Feb 16 2018 12:11AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राधानगरी अभयारण्यात गुरुवारपासून (दि.15) पुन्हा नव्याने वन्यजीव गणना सुरू झाली. यापूर्वी झालेल्या प्राणीगणनेत जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम)  रीडिंग घेण्यात आले नव्हते. त्यामुळे ती गणना रद्द ठरवण्यात आली. आजपासून सुरू झालेली गणना 20 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यासाठी वन विभागाने वनपाल, वनरक्षक यांना सूचना देऊन कार्यवाही सुरू केली आहे. राधानगरी अभयारण्यात प्राणीगणनेचीच ‘शिकार’ या मथळ्याखाली दैनिक ‘पुढारी’ने निष्फळ ठरलेल्या प्राणीगनणेवर  प्रकाशझोत टाकून दोषींवर कारवाईची मागणी केली होती.

जगातील अतिसंवेदनशील मानल्या जाणार्‍या पश्‍चिम घाटरांगांपैकी राधानगरी अभयारण्य हा भाग आहे. त्यामुळे या जंगलपट्ट्यात वन्यप्राण्यांसह, वनस्पती, फुलपाखरे, कीटक आदींच्या दुर्मीळ प्रजाती आहेत. वाघ, बिबटे या वन्यप्राण्यांचा वावर या जंगलात असण्यासह गवा ही या जंगलाची खास ओळख आहे. अलीकडे अस्वलांची संख्या या अभयारण्यात वाढत चालली आहे. त्यामुळे तुलनेने हे अभयारण्य हे जैवविविधतेने परिपूर्ण संकल्पनेतील आहे. 

राधानगरी अभयारण्यात 25 जानेवारीपासून झालेली वन्यजीव गणना निष्फळ ठरली.  कारण या गणने दरम्यान जीपीएस रीडिंग घेतले नाही.  वनपाल आणि वनरक्षक संघटनेने विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारल्याचा परिणाम गणनेवर झाला. त्यामुळे रात्रंदिवस परिश्रम करून तसेच मोठी सामग्री वापरून करण्यात आलेल्या प्राणीगणना व्यर्थ झाली. सरकारी सामग्रीचा आणि वेळेचा अपव्यय करून प्राणीगनणा दुसर्‍यांदा करण्यास भाग पाडणार्‍यांवर वन विभागाने अद्यापही कसलीही कारवाई केलेले दिसत नाही. याबाबत कारवाई केली तरच भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत.