होमपेज › Kolhapur › गुणवंत खेळाडूंना मागे पडू देणार नाही

गुणवंत खेळाडूंना मागे पडू देणार नाही

Published On: Mar 04 2018 1:43AM | Last Updated: Mar 04 2018 12:16AMकोल्हापूर : प्रतिनिधी

खेळाडूंच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहेच, पण कोणत्याही गुणवंत खेळाडूला आर्थिक कारणास्तव मागे पडू देणार नाही, त्यासाठी व्यक्तिगत पातळीवरही प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्यांचा पाटील यांच्या हस्ते शनिवारी गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराबाई सभागृहात हा कार्यक्रम झाला. 2020 मध्ये होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत अधिकाधिक यश मिळवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, असे आवाहनही त्यांनी केले.

राज्यात पुण्यानंतर सर्वाधिक 23 पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्याला प्राप्त झाल्याने विशेष आनंद होत आहे. पुरस्कारामुळे व्यक्तिगत जीवनात एक उंची गाठली जाते, पण या पुरस्कारांनी जिल्ह्याचीही मान उंचावली आहे असे सांगत पालकमंत्री म्हणाले, क्रीडा विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. अनुभवी प्रशिक्षक, अत्याधुनिक क्रीडा साधने, जिल्हा नियोजनमधून क्रीडांगणासाठी व क्रीडा साहित्यासाठी निधी दिला जात आहे. खेळाडूंना थेट नोकरी देण्याचाही निर्णय घेतला आहे. 2020 मध्ये होणार्‍या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी जास्तीत जास्त खेळाडूंवर लक्ष केंद्रित करून अधिकाधिक पदके जिल्हा, राज्य व देशाला मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असे, आवाहन त्यांनी केले. जीवन गौरव पुरस्कारासाठी बिभीषण पाटील यांची एकमताने समितीने निवड केल्याचा उल्लेख त्यांनी अवर्जून केला.

प्रत्येक निवडणुकीत भाजप जिंकत चालला आहे. त्यामुळे भाजपची राज्य मोजणे बंद केले आहे. तसेच जिल्ह्यातील पदकांची संख्या मोजणे बंद केले पाहिजे, ऑलिम्पिकमध्ये यश मिळविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असेही ना. पाटील यांनी सांगितले.

मानपत्र, शाल व भेटवस्तू देऊन पुरस्कार विजेत्यांना गौरविण्यात आले. बिभीषण पाटील यांचा विशेष गौरव करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी प्रास्ताविक केले.अनिल पवार यांनी मनोगत व्यक्त केले. क्रीडा मार्गदर्शक अजित पाटील, चंद्रकांत चव्हाण, प्रदीप पाटील यांचा तसेच खेळाडू म्हणून मंदार दिवसे, विजय मोरे, ओमकार ओताडी, गणेश माळी, अनिल पवार, नलिनी डवर, सचिन पाटील, विक्रम इंगळे, रोहित हावलदार, अजिंक्य रेडेकर, कौतुक डाफळे, स्वप्निल कुसाळे, ऋचा पुजारी, प्रीती इंगळे, विक्रम कुर्‍हाडे, अमित निंबाळकर, अभिषेक जाधव, शुक्ला बिडकर यांचा तर संघटक कार्यकर्ता म्हणून संभाजी वरुटे यांचा गौरव करण्यात आला. 

यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.