Tue, Mar 19, 2019 20:32होमपेज › Kolhapur › सुसाट कारचा थरार

सुसाट कारचा थरार

Published On: Apr 28 2018 1:42AM | Last Updated: Apr 28 2018 1:06AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

मद्यधुंद अवस्थेत चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने सुभाष रोडवर वाहनधारकांना थरार अनुभवायला मिळाला. शुक्रवारी सायंकाळी कारचालकाने दोन दुचाकींना उडवले. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम परिसरात तो दुभाजकावर जाऊन आदळला. त्याचा पाठलाग करून नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलिस ठाण्यातही या चालकाने गोंधळ घातला. सुभाष रोहिदास (रा. निगवे खालसा, ता. करवीर) असे कार चालकाचे नाव आहे.

सायंकाळी सहाच्या सुमारास तो गोखले कॉलेज चौकातून हॉकी स्टेडियमकडे निघाला होता. त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने महालक्ष्मीनगर परिसरात रस्त्याकडेला थांबलेल्या मोपेडला धडक दिली. ही मोपेड घेऊन सुप्रिया नायर यांची मुलगी दुकानात आली होती. ती दुकानात खरेदी करत असल्याने अपघातातून बचावली. धडकेनंतर मोपेड सुमारे दहा फूट अंतरावर जाऊन पडली. अशाच अवस्थेत कारचालक रोहिदास भरधाव हॉकी स्टेडियमकडे गेला. 

विश्‍वपंढरी हॉलसमोर त्याने आणखी एका मोटारसायकलला धडक दिली. या ठिकाणी कारचा समोरील भाग तुटून बाजूला पडला. त्यानंतरही तो पुढे निघून गेला. यावेळी संतप्‍त नागरिकांनी त्याचा पाठलाग सुरू केला. ध्यानचंद हॉकी स्टेडियमजवळ सिग्‍नलच्या अलीकडे तो रस्ता दुभाजकला जाऊन धडकला. नागरिकांनी त्याला कारमधून बाहेर ओढून चोप दिला.  

संशयित रोहिदास याच्या ताब्यातील कार याआधी पोलिसांनी एका गुन्ह्यात जप्‍त केली होती. यामुळे रोहिदासचे काही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत. या कारला नंबरप्लेट नसल्याने पोलिसांचा संशय आणखी बळावला.