Sun, Jul 21, 2019 14:57
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › वडणगेमधील ऐतिहासिक शिव-पार्वती मंदीर 

वडणगेमधील ऐतिहासिक शिव-पार्वती मंदीर 

Published On: Aug 25 2018 1:14AM | Last Updated: Aug 25 2018 11:00AMपरशराम पाटील :  पुढारी ऑनलाईन 

देशभरात शंकर-पार्वती यांची नखशिखांताने नटलेली अनेक मंदिरे पाहायला मिळतात, पण एकाच गावामध्ये शंकर व पार्वती यांची स्वतंत्र देखणी मंदिरे असणे व ती सुद्धा त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली असणे हा दुर्मिळ योगायोगच म्हणावा लागेल. असाच दुर्मिळ योगायोग कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला पंचगंगेच्या नदीच्या तीरावरील अवघ्या तीन किमी अंतरावर वडणगेमध्ये गावामध्ये आहे. अतिशय प्राचीन वारसा लाभलेले गाव म्हणून वडणगेची नोंद आहे. 

गावामध्ये शंकर व पार्वती यांची स्वतंत्र मंदिरे, दोन्ही मंदिराच्या बरोबर मध्यभागी कोंबड्याची शिळा, बाजूला नयनरम्य त्र्यंबकेश्वर तलाव असा हा परिसर आहे. विशेष म्हणजे शंकराच्या मंदिराच्या मागील बाजूस हिंदू-मुस्लीम एक्याचे प्रतीक असलेला दर्गा सुद्धा आहे. असा विलक्षण योगायोग असलेले वडणगे गावामध्ये शंकर-पार्वतीची मंदिरे आहेत. 

गावाला वडणगे हेच नाव का पडले ? 

कोल्हापुरच्या पश्चिमेला हाकेच्या अंतरावर असलेल्या शंकर-पार्वतीच्या वास्तव्याने तसेच छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वडणगेला धार्मिक तसेच सांस्कृतिक अशी परंपरा आहे. शाहु महाराज आपल्या लवाजम्यासह सोनतळी  बाजूकडील छावणीकडे जात असत. त्यामुळे वडणगे गावाशी त्यांचा नित्यनियमाने संपर्क येत असे. इतकेच नाही तर महाराजांच्या दिमतीला अनेक ग्रामस्थ राजवाड्यावर होते. पंचगंगेपासून वडणगेला जाताना रस्त्यावर पूर्वी अनेक वडाची झाडे होती. त्यामुळे नदीकाठचा परिसर आणि सोबतीला वडाची झाडे असल्याने गावाचे नाव वडणगे झाले असावे असे बोलले जाते. 

 शिव-पार्वतीच्या पदस्पर्शाने ऐतिहासिक पार्श्वभूमी 

करवीरची महती सांगणाऱ्या करवीर महात्म्य या ग्रंथामध्ये वडणगेचा करवीर काशी असा उल्लेख आहे. शंकराच्या मंदिराच्या बाजुला आजही प्राचीन दगडी अवशेष पाहायला मिळतात. त्यामुळे या मंदिरांना अतिशय प्राचीन परंपरा असल्याचे सिद्ध होते. चौदाव्या शतकामध्ये मुघलांनी अनेक हिंदू मंदिरांवर अतिक्रमण करून जमीनदोस्त केली. तत्कालिन परिस्थितीमध्ये मुघलांकडून या मंदिराच्या बाबतीत सुद्धा तसा प्रयत्न झाला असावा असे मानायला हरकत नसावी असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. मंदीराचे नव्याने बांधकाम होळकर घराण्याच्या काळात झाले. पार्वती मंदिराला लागून धर्मशाळा सुद्धा  आहे. मंदीरातील विंड व नंदी हे काळ्या पाषाणातील आहेत. सन १९९१ पासून ते २०१० पर्यंत मंदिराचा जीर्णोध्दाराचे काम पूर्ण करण्यात आले.


या कारणामुळे शंकर पार्वतीचे मंदीर वडणगेमध्ये 

प्राचीन ग्रंथातील उल्लेखानुसार वडणग्यामध्ये अगस्ती ऋषींनी शंकर पार्वतीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली असल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर असा सुद्धा येथील शंकर पार्वतीचा उल्लेख केल्याचा आढळतो.  शंकर व पार्वती दक्षिणेकडून उत्तरेकडे कैलास पर्वतावर जात असताना ते गावाच्या बाहेर वास्तव्याला होते. काही कारणाने शंकर गावामध्ये आले असतानाच कोंबडा आरवला. त्यामुळे शंकर गावामध्येच राहिले व पार्वती गावाच्या बाहेर राहिल्या अशी दंतकथा सांगितली जाते. विशेष म्हणजे शंकर व पार्वतीच्या मंदीरांच्या मध्यभागी आरवलेल्या कोंबड्याची शिला आजही अस्तित्वात आहे. ग्रामस्थ आजही भक्तीभावाने त्या कोंबड्याची पुजा करतात. कोंबड्याची पुजा करणारे हे एकमेव गाव असावे. वडणगे गावामध्ये असणाऱ्या शिव पार्वती मंदिराइतकेच गावात असणाऱ्या तलावाला सुद्धा ऐतिहासिक व पौराणिक वारसा आहे. सन १९७१ पर्यंत वडणगेतील लोक त्या तलावातील पाण्याचा पिण्यासाठी वापर करत होते. 

महाशिवरात्रीला गावात मोठी यात्रा भरते. राज्यभरातून मोठ्या भक्तीभावाने लोक वडणगे गावामध्ये दाखल होतात. नवरात्रोत्सवामध्ये पार्वती देवीची विविध रुपात सांलकृत पुजा बांधली जाते. श्रावण महिन्यात भजन, किर्तन, ज्ञानेश्वरी पारायण असे विविध कार्यक्रम होत असतात. त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सवाचे आयोजन केले जाते.