Sat, Jul 20, 2019 08:37होमपेज › Kolhapur › तब्बल 8 फूट लांब ‘वतन’पत्रातून इतिहासाचा उलगडा

तब्बल 8 फूट लांब ‘वतन’पत्रातून इतिहासाचा उलगडा

Published On: Mar 01 2018 1:38AM | Last Updated: Mar 01 2018 12:43AMकोल्हापूर : सागर यादव 

कोल्हापूर कोटावर (किल्ला) उत्तरेकडून आक्रमण झाले असताना अवघे 20 नाईक व हशम घेऊन पराक्रमाची शर्त केल्याबद्दल करवीरचे छत्रपती संभाजी महाराज यांनी 260 वर्षांपूर्वी ‘सरनाईक’ वतन दिले होते. या संदर्भातील तब्बल 8 फूट लांबीचे आणि 6 इंच रुंदीचे मोडीलिपीतील ‘वतनपत्र’ प्रकाशात आले आहे. इतिहास संशोधक, मोडीलिपी अभ्यासक उदयसिंह राजेयादव यांनी या संदर्भातील संशोधन केले आहे.शीतलकुमार अजितसिंह सरनाईक यांच्याकडे या संदर्भातील मूळ कागदपत्रे आजही सुस्थितीत आहेत.    

ऐतिहासिक दस्तऐवज किंवा शिलालेखांना इतिहासातील अस्सल संदर्भ साधणांचे महत्त्व आहे. एकेकाळी अवघ्या महाराष्ट्राची व्यवहार भाषा असणार्‍या मोडीलिपीची लाखो कागदपत्रे आज ठिकठिकाणी धूळखात पडली आहेत. अशा या ऐतिहासिक दस्तऐवजात शेकडो वर्षांचा इतिहास सामावलेला आहे. यापैकी बहुतांशी कागदपत्रांचे वाचनच झाले नसल्याचे वास्तव आहे. यामुळे नष्ट होणार्‍या कागदपत्रांसोबत यात दडलेले इतिहासाचे विविध पैलूही इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहेत. 

वास्तविक ‘राष्ट्राची संपत्ती’ असे महत्त्व आणि मोल असणार्‍या इतिहासाचे जतन-संवर्धन आणि संरक्षण व्हावे, या उद्देशाने राष्ट्रीय मोडी इतिहास प्रबोधिनी सारख्या संस्था-संघटना सक्रिय आहेत. मोडी जाणकार तयार करणे, दुर्लक्षित ऐतिहासिक दस्तऐवजांचे वाचन करणे, कागदपत्रांचे जतन-संवर्धन करणे आणि स्फूर्तीदायी इतिहास भावी पीढीपर्यंत पोहोचविणे अशा स्वरुपाचे कार्य या संस्थांतर्फे केले जाते. 

10 गावांची जमिन इनाम...

सुभानजी सरनाईक यांनी छत्रपतींची प्रमाणिक सेवा केल्याबद्दल वडकशिवाले, मौजे नंदगाव, चुये, येवती, नागाव खुर्द, इसपूर्ली, कावणे, म्हाळूंगे, वडगाव खुर्द, बेले अशा 10 गावातील जमिन इनाम दिल्याचे उल्लेख आहेत. याशिवाय महाकाली देवीचीपूजा अर्चा वंशपरंपरागत करावी यासाठी दिंडनेर्ली येथे जमिन इनाम दिली होती. याशिवाय धनगराकडून बोकड, साळीकडून कापड, तेल घाण्यातून तेल यासाठी इनाम गावातून 1 रुका जकात  व दहा गावात पालक घर असे इनाम देण्यात आल्याचे उल्लेख इनाम पत्रात असल्याचे राजेयादव यांनी सांगितले.