Tue, Jun 25, 2019 21:20होमपेज › Kolhapur › ‘दक्षिण’मध्ये उफाळणार कडवा संघर्ष

‘दक्षिण’मध्ये उफाळणार कडवा संघर्ष

Published On: Aug 22 2018 12:56AM | Last Updated: Aug 21 2018 11:08PMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वीच कोल्हापुरात विधानसभा निवडणुकीच्या शहर दक्षिण मतदारसंघात मैदानाच्या डागडुजीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यामध्येच नव्हे तर राज्यात लक्षवेधी ठरणार्‍या या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री सतेज पाटील यांनी शड्डू ठोकला असून एका बाजूला मतदारांना भावनिक आवाहन करतानाच दुसर्‍या बाजूला भाजप विरोधकांची मोट बांधण्याचे काम त्यांनी गतिमान केले आहे. यामुळे शहर दक्षिण मतदारसंघातील आगामी विधानसभा निवडणूक लक्षवेधी ठरेल, असे संकेत मिळण्यास सुरुवात झाली आहे. सतेज पाटील यांचे वडील डॉ. डी. वाय. पाटील यांनी सतेज पाटील यांना भाजप प्रवेशाचा जाहीर सल्ला दिला होता. त्यावर त्यांनी खुलासा करीत आपण काँग्रेसमध्येच राहणार, असे स्पष्ट केले आणि पाठोपाठ मेळावाही घेतला. मेळाव्यात महाडिक यांचे नाव न घेता, ज्यांनी माझी फसवणूक केली, त्यांना जागा दाखविणार, अशी आव्हानाची भाषाही  वापरली. दक्षिणेतून लढणार म्हणून रणशिंग फुंकले. आता दक्षिणेत कडवा संघर्ष उफाळणार, हे उघड आहे.

पश्‍चिम महाराष्ट्राच्या नकाशावर कोल्हापूर शहर दक्षिण हा सर्वाधिक लक्षवेधी आणि अतिसंवेदनशील मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. 2004 सालच्या निवडणुकीत तत्कालिन मंत्री दिग्विजय खानविलकर यांचे संस्थान खालसा झाल्यानंतर या मतदारसंघावर सतेज पाटील यांनी मांड ठोकली होती. त्या निवडणुकीत त्यांना जिल्ह्याच्या राजकारणात राम-लक्ष्मण जोडी म्हणून संबोधिले जात होते. या जोडीतील लक्ष्मणाची भूमिका बजावणार्‍या धनंजय  महाडिक यांनी मोठी भूमिका बजावत सतेज पाटलांसाठी विधानसभेचे दरवाजे उघडण्यात योगदान दिले. यानंतर मात्र या जोडीमध्ये वितुष्ट आले. टोकाची ईर्ष्या आणि प्रतिस्पर्ध्याची पाठ मैदानाला लावण्यासाठी राजकारणातील सर्व आयुधांचा उपयोग दोघांकडूनही झाला. या दरम्यान, सतेज पाटील यांनी  महाडिकांचा निसटता पराभव करीत राज्यमंत्रिपद हस्तगत केले. दुसरीकडे विशिष्ट परिस्थितीचा लाभ मिळाल्याने धनंजय महाडिक लोकसभेत पोहोचले. विधानसभेला महाडिक गटाने सतेज पाटलांचा पराभव करून पुन्हा राजकारणात उचल खाण्याचा प्रयत्न केला;  पण विधान परिषद निवडणुकीत जिल्ह्याचे किंगमेकर महादेवराव महाडिक यांना पराभूत करून त्यांनी संघर्ष कायम ठेवला. आता या संघर्षाचा चौथा अध्याय सुरू होतो आहे. कोल्हापूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे राजकारण तसे  संवेदनशील आहे. या मतदारसंघात पक्षाचे तिकीट मिळवून सहजासहजी घरात बसून निवडून येण्यासारखी स्थिती नाही.
विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर 2019 मध्ये होत आहे. या पार्श्‍वभूमीवर गेल्या चार वर्षांमध्ये जिल्ह्याच्या राजकारणात मोठी स्थित्यंतरे घडली आहेत. काँग्रेसचा प्रभाव कमी होऊन विविध ठिकाणी कमळ फुलले आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस राजकारणाचेच तंत्र वापरून जिल्ह्यात भाजप वाढविण्यासाठी जीवाचे रान केले आहे. त्यांचेच बोट पकडून दक्षिण मतदारसंघात आ. अमल महाडिक यांनी कोट्यवधी रुपयांच्या निधीची कामे मंजूर करून आणली आहेत. याउलट गत निवडणुकीत भाजपसोबत असलेली आणि दक्षिण मतदारसंघात मोठे उपद्रवमूल्य असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपविरोधात उभी ठाकली आहे. यात भरीत भर म्हणून शिवसेनाही नाराजीचा सूर आळवताना दिसत आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांना आता परिस्थितीचे भान येण्यास सुरुवात झाली आहे. या सारिपाटाचा विचार करता दक्षिणेत विधानसभेला भाजप आणि जिल्ह्याच्या राजकारणात रत्नाप्पा कुंभार यांच्यानंतर प्रत्येक तालुक्यात स्वतःचे उपद्रवमूल्य असणारा महाडिक नावाचा पक्ष विरुद्ध विरोधक असे लढाईचे प्राथमिक चित्र दिसते आहे. या लढाईत शिवसेनेची भूमिका काय राहते हे जसे महत्त्वाचे तसे सतेज पाटील विरोधकांची मोट बांधण्यात कितपत यशस्वी होतात यालाही मोठे महत्त्व आहे. अर्थात दक्षिण मतदारसंघाचा संघर्ष कडवा असणार आहे आणि एकेका मतासाठी उमेदवारांची दमछाक होणार आहे हे मात्र नक्की!