Sun, Mar 24, 2019 22:55
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › ‘सोनू’च्या मृत्यूनंतर वाहतूक नियम पाळण्याचा शेकडोंचा निर्धार

‘सोनू’च्या मृत्यूनंतर वाहतूक नियम पाळण्याचा शेकडोंचा निर्धार

Published On: May 09 2018 8:30AM | Last Updated: May 09 2018 8:30AMकोल्हापूर :  प्रतिनिधी 

वाहतूक कोंडीने घेतला हसर्‍या ‘सोनू’ चा बळी या मथळ्याखाली मंगळवारी (दि.8) दैनिक ‘पुढारी’तून प्रसिद्ध झालेल्या वृत्ताने वाहतुकीसंदर्भात चर्चेचे मंथन घडवले. सोशल मीडियावरून अनेकांनी ‘सोनू’च्या कुटुंबीयांची जाहीर माफी मागून दु:ख व्यक्‍त केले. यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी अनेक संस्था व संघटनांनी वाहतूक नियमांच्या जागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. 

करियाप्पा शिवाजी कारदगे यांच्या तीन वर्षांच्या कार्तिक (सोनू) या मुलावर वाहतूक कोंडीत अ‍ॅम्बुलन्स अडकल्याने वेळेत उपचार झाले नाहीत. त्यामुळे त्याचा पित्याच्या मांडीवरच दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबतचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सोशल मीडियावर याची दिवसभर चर्चा झाली. अनेकांनी सोनूच्या आई-वडिलांची जाहीर माफी मागितली. तर अनेकांनी स्वत: वाहतूक नियमांचे पालन करणार असल्याची शपथ घेतली.   मूळचे गडहिंग्लजचे असलेल्या करियाप्पा कारदगे यांनी यापुढे कुणीही बाप पोरका होऊ नये यासाठी अ‍ॅम्बुलन्सला कृपया वाट द्या, असे तळमळीने सोशल मीडियावरून आवाहन केले आहे. 

नियम पाळण्याची केला निर्धार

यापुढे वाहतुकीचे नियम पाळून अ‍ॅम्बुलन्सला वाट देण्यासाठी स्वत: पुढाकार घेईन अशा पद्धतीने अनेकांनी सोशल मीडियावरून निर्धार केला. यामध्ये  जावेद तांबोळी, ज्ञानराज पाटील, सचिन पाटील, डॉ. विकी आरळेकर, राहुल माने, सरदार पाटील, श्रीधर पाटील, सुयश निकम, दिनकर जाधव, सुनीता वर्दळे आदींसह अनेकांनी  वाहतुकीचे काटेकोर पालन करण्यासह इतरांनाही वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी प्रवृत्त करण्याचा निर्धार व्यक्‍त केला आहे. 

वाहतूक नियमांची लोकचळवळ

सुधर्म वाझे, अमरदिप पाटील, डॉ. विरेंद्र पवार, डॉ. अर्चना पवार, डॉ. रेश्मा पवार, प्राचार्य किरण पाटील, आनंद पराडकर, हर्षल सुर्वे आदींसह अनेकांनी एकत्र येऊन वाहतूक नियमनासाठी जागृती करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी वाहतूक कोंडीची ठिकाणे निश्‍चित करणे आणि  वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवे उपक्रम राबवण्याचा भर देणार असल्याचे संबंधितांनी स्पष्ट केले आहे. यासह रस्त्यांवर अ‍ॅम्बुलन्ससाठी रस्ता नेहमी मोकळा राहील यासाठी ठोस काम करण्यासाठी तज्ज्ञ समितीचीही नियुक्ती करुन उपाययोजना सुचवल्या जाणार आहेत. अशा असंख्य लोकांनी सोशल मीडियावरुन कोल्हापूरची वाहतूक शिस्तबद्ध करण्यासाठी नियोजनबद्ध काम करण्याचे जाहीर केले आहे. 

माफ करा...

मला  माहिती आहे. माफी मागून तुमचं बाळ परत येणार नाही. आम्हाला माफ करा. अशी अनेकांनी ‘सोनू’ च्या आई-वडिलांची माफी सोशल मीडियाच्या माध्यमातून मागितली आहे. तसेच  यापुढे आम्ही वैयक्‍तिकरीत्या आता अशा घटना घडू नयेत यासाठी निश्‍चित प्रयत्न करणार आहे. महिन्यातून किमान चार दिवस तरी आम्ही यासाठी पूर्णवेळ देऊ अशा आशयाचा संदेश अनेकांनी स्वत:च्या नावाने सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे.

Tags : sonu, accidental death, Carefully, follow, traffic rules, kolhapur news