होमपेज › Kolhapur › कासारवाडीत माय-लेकराची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

कासारवाडीत माय-लेकराची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Published On: Feb 12 2018 1:52AM | Last Updated: Feb 12 2018 12:22AMटोप : वार्ताहर

कासारवाडी (ता. हातकणंगले) येथील प्रियांका उमेश माने (वय 27) यांनी सात वर्षांचा मुलगा पार्थसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी ही घटना घडली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

प्रियांका यांच्या पतीचे अपघाती निधन झाले असून त्या मुलगा पार्थसह गावातच माहेर असल्याने आईकडे राहत होत्या. सकाळी त्या सोयाबीन मळणीनंतरचे भूस शेणी लावण्यासाठी आणते, असे घरी सांगून मुलासह धरणाकडील शेतात गेल्या होत्या. तिथे माने यांच्या विहिरीत त्यांनी मुलासह आत्महत्या केली. घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे. मृतदेह शोधण्यासाठी जीवरक्षक दिनकर कांबळे, टोप येथील अमित पाटील व ग्रामस्थांनी प्रयत्न केले. भारनियमन असल्याने  व विहिरीत 50 फूट पाणी असल्याने मृतदेह शोधमोहिमेत अडथळे येत होते. प्रियांकाचा मृतदेह दुपारी अडीचच्या सुमारास सापडला, तर पार्थचा मृतदेह रात्री आठ वाजता सापडला.

घटनास्थळी करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज गुरव, शिरोलीचे स.पो.नि. परशुराम कांबळे व सहकार्‍यांनी भेट दिली. माय-लेकरांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.