Fri, Mar 22, 2019 05:35
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › कर्जमाफी धोरणातील त्रुटी दूर करा

कर्जमाफी धोरणातील त्रुटी दूर करा

Published On: Feb 04 2018 1:50AM | Last Updated: Feb 04 2018 12:56AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कर्जमाफीच्या धोरणातील त्रुटी दूर कराव्यात, नियमित कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना या योजनेचा जादा लाभ द्यावा, यासह अन्य मागण्यांसाठी आ. सत्तेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत अनेक नेत्यांनी फसव्या कर्जमाफीचा निषेध केला. 

आ. सतेज पाटील म्हणाले, शासनाने कर्जमाफी जाहीर करून सहा महिने उलटले तरी घोळ संपलेला नाही. सोसायटीच्या सचिवांकडून सरकार वेगवेगळी माहिती मागवत आहेत.पण त्यातून सरकारचे समाधान काही होत नाही. यावर या सरकारची कर्जमाफीची योजना फसल्यातील प्रकार आहे.  जोपर्यंत कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत रस्त्यावरील लढाई सुरूच ठेवावी लागणार आहे, 

आ. पाटील म्हणाले,  प्रामाणिक कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहन अनुदान योजनेचा अधिक लाभ द्यावा, अशी आमची मागणी आहे. दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. त्यापेक्षा कर्ज असेल तर सरकार ते कर्ज भरा म्हणते, पण तेवढे पैसे शेतकरी कोठून आणणार, त्यापेक्षा कर्जमाफीचे दीड लाख त्या शेतकर्‍याच्या नावावर जमा करुन घ्या आणि उर्वरित कर्जाची परतफेड करण्यासाठी हप्‍ते पाडून द्यावेत. 

बोलबच्चन, घोषणाबाज सरकार

भाजपप्रणीत सरकार सत्तेवर आल्यापासून जनतेचे कल्याणकारी कसलेच काम केलेले नाही. फक्‍त घोषणा करत हे सरकार सुटले आहे. कर्जमाफीसाठी 37 हजार कोटी शेतकर्‍यांना दिले, असे सांगितले जाते. पण 20 हजार कोटीही दिले गेले नाहीत, अशी परिस्थिती आहे. यावरून हे सरकार घोषणा बाज सरकार आहे, असे आ. पाटील म्हणाले. यावेळी जि.प.सदस्य बजरंग पाटील, किरण पाटील, अंजनाताई रेडेकर यांची भाषणे झाली. मोर्चात ऋतुराज पाटील, जि.प. सदस्य भगवान पाटील, बाबासो चौगले, शशिकांत खोत, तौफिक मुल्‍लाणी, मोहन सालपे, करवीर पं.स.सभापती प्रदीप झांबरे, आनंद माने, संध्या घोटणे, प्रा. निवास पाटील, विश्‍वास नेजदार, सदाशिव चरापले, श्रीपती पाटील आदी उपस्थित होते.

चंद्रकांतदादा, शेतकर्‍यांकडे लक्ष द्या

पालकमंत्री पाटील हे जिल्ह्याच्या राजकारणात जास्त लक्ष देतात. विविध महोत्सव भरविणे यासह वेगवेळे कार्यक्रम आयोजित करण्यास त्यांना वेळ आहे, मात्र त्यांना शेतकर्‍यांच्या अडचणीकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. अशी माणसे  राज्याच्या सत्तेवर आहेत, असा उद्वेग व्यक्‍त करत चंद्रकांतदादा, जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष घालण्याचे थांबवून शेतकर्‍यांच्या अडचणी समजावून घ्या, अशी अपेक्षा आ. सतेज पाटील यांनी व्यक्‍त केली.