Mon, Apr 22, 2019 03:45होमपेज › Kolhapur › ‘सोशल’ उचापतखोरांना आवरा! 

‘सोशल’ उचापतखोरांना आवरा! 

Published On: Apr 30 2018 1:43AM | Last Updated: Apr 29 2018 11:17PM
कोल्हापूर : विजय पाटील 

विषय कुठलाही असो भडकाऊ स्टेटमेंट करून माणसां-माणसांमध्ये आग लावण्याचा नवा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू झाला आहे. अशा ‘सोशल’ आगलाव्यांना आपण समाजात फूट पाडतोय याचेही भान राहिलेले नाही. हा संघर्ष आता गावागावांत आणि गल्लोगल्लीत पोहोचला आहे. कोणत्याही विषयांचा विपर्यास करणार्‍या या या  ‘सोशल’ उचापतखोरांना आवरा रे! असे आवाहन आता सोशल मीडियातूनच केले जात आहे.

मंगळवेढा (जि. सोलापूर) येथे सोशल मीडियावरील पोस्टला प्रतिक्रिया दिली म्हणून एका तरुणाचा खून करण्यात आला. ही पोस्ट काय होती किंवा त्यावरची प्रतिक्रिया बरोबर होती की नव्हती हा विषय बाजूला ठेवूया, पण सोशल मीडियावर भडखाऊ आणि आगलाव्या पोस्ट करणार्‍यांची संख्या प्रचंड वाढू लागली आहे हे मात्र निश्‍चित. गिरगाव (ता. करवीर) या गावांत काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील पोस्टमुळे आणि त्यावरील प्रतिक्रियेमुळे तणाव निर्माण झाला होता. या प्रकाराने शेकडो वर्षे गुण्यागोविंदाने नांदणारे गाव संघर्षाच्या भूमिकेत येते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती; परंतु अनर्थ ओळखून पोलिसांनी हे प्रकरण यशस्वीपणे हाताळले.  

सोशल मीडिया हे माणसांशी संवाद साधण्याचे सर्वात चांगले माध्यम आहे, पण प्रत्येक गोष्टीचा दुरुपयोगच केला पाहिजे असे वाटणार्‍यांनी या माध्यमाला असोशल रूप द्यायचा प्रयत्न सुरू केला आहे. मिसरूडही न फुटलेले अनेकजण वाट्टेल त्या घटनेवर हिंसक मजकूर लिहून मोकळे होतात. या मजकुराने कुणाच्या भावना दुखावतील किंवा माणसामाणसांत फूट पडेल असे काही त्यांच्या गावीही नसते.  सुटलेला बाण एकवेळ परत आणता येईल, पण सोशल मीडिया हे असे माध्यम आहे की एकदा तुम्ही व्यक्त झालात की क्षणभरात ते जगभरातील अवकाश व्यापते. ही गोष्ट परत घेणे अशक्य आहे. त्यामुळे येथे व्यक्त होताना हजारदा विचार करून व्यक्त झाले पाहिजे ही साधी गोष्ट समजून घ्यावी लागेल आणि इतरांनाही सांगावी लागेल. 

सोशल मीडियाचा सदुपयोग करून अनेक मंडळी प्रेरणादायी लिहितात. लोकांना मार्गदर्शन करतात. अशांचे प्रमाणही मोठे आहे हे सुद्धा मान्य आहे,  पण अलीकडे माणसांमध्ये संघर्षच उभा राहील अशा पद्धतीने लिहणार्‍यांची संख्या वाढली आहे. या गोष्टींमुळे सतत संघर्ष उभा राहत असल्याचे दिसू लागले आहे. सोशल ‘उचापतखोरां’ना पालकांनी, मित्रमंडळींनी आणि सोशल मीडियावरील फ्रेंडस्नी आवरायला हवे. क  पोलिसांच्या सायबर क्राईम विभागानेही अशांवर लक्ष ठेवून  कारवाई केली पाहिजे.  

 ‘ट्रोलिंग’चा व्हायरस

 एखाद्या घटनेवर  कोणी (विशेषत: सेलिब्रेटी) काही मत व्यक्त केले तर अशांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचेही प्रकार वाढले आहेत.  सोशल मीडियावरील ‘ट्रोलर्स’ची फौज  नकारात्मक प्रतिक्रिया देऊन बेजार करू लागते. या ट्रोलिंगचा सर्वात जास्त सामना मुली-महिला आणि ज्येष्ठांना सहन करावा लागत असल्याचे दिसते. हा ट्रोलिंगचा व्हायरस वाढत चालला आहे. 

जपान आणि आम्ही...

जपानमधील तरुणाई सोशल मीडिया कसा हाताळते याबद्दलचा सर्व्हे मध्यंतरी एका खासगी कंपनीने अलीकडे प्रसिद्ध केला होता. यामध्ये जपानमधील दोन टक्के तरुणाईच राजकीय विषयावर भाष्य करत असल्याचे म्हटले आहे. ही दोन टक्के मंडळीसुद्धा पॉलिटिक्स हा विषय घेऊन पदवी घेणारी असल्याने त्यांचा राजकीय घडामोडीत रस असल्याचेही निष्कर्षात नमुद केले आहे. राहिलेले 98 टक्के तरुण नवे संशोधन आणि माणसांचे जगणे सोपे कसे होईल अशा उपकरणांची  चर्चा या माध्यमातून करतात. आपण आपल्या देशासाठी सर्वोत्तम काय करू शकतो याबाबत ही तरुणाई सातत्याने चर्चा करताना दिसते. राजकारण आणि संघर्ष निर्माण करणार्‍या गोष्टींना जपानची तरुणाई फार महत्त्व देत नसल्याचे त्यांच्या मजकुरावरून दिसून आले, पण आपल्याकडे मात्र सोशल मीडियावरील चर्चांचे हेच प्रमाण जपानच्या उलटे दिसून येते.

सोशल मीडियावरील चर्चा

>राष्ट्रपुरुष, महिला, मुलींबाबत असभ्य पोस्ट टाकणे
>एखाद्याच्या श्रद्धास्थानांवर जाणीवपूर्वक टीका
 >ऐतिहासिक घटना, त्याच्या संदर्भाचा विपर्यास करणारा  मजकूर टाकणे 
 >दोन समाजांमध्ये फूट पडतील असे मजकूर आणि व्हिडीओ पसरवणे.