होमपेज › Kolhapur › सोशल कट्ट्यावरील पॉझिटिव्ह ‘युथ’ मुव्हमेंट!

सोशल कट्ट्यावरील पॉझिटिव्ह ‘युथ’ मुव्हमेंट!

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 12 2018 1:22AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : विजय पाटील

सोशल मीडिया म्हणजे निव्वळ टाईमपास... फालतू चर्चा अन् टुकार कमेंटस्... नको त्या स्टेटस् अपडेटस्... अशी चर्चा अनेकजण (जे सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत असेही काही नेटिझन्स्) करतात. हे काही अंशी खरं असलं तरी सोशल मीडियामुळे अनेक चळवळीही सुरू झाल्या आहेत. ज्यातील नेटिझन्स्ना समाजात काही तरी चांगलं व्हावं असं वाटतंय...त्याला दुसर्‍याला मदत करायचीही इच्छा आहे आणि तो करतही आहे. समाजात घडणार्‍या प्रत्येक घटनेचं प्रतिबिंब पाहायचं असेल तर ते आता सोशल मीडियावरच पाहायला मिळते. 

मेरी बेटी, मेरा अभिमान, सेल्फी वुईथ डॉटर, आय लव्ह माय इंडिया, माझा देश, मी देशाचा, स्वदेशी वापरा, रोजगार वाढवा...अशा अनेक मोहिमा नेटकर्‍यांनीच सुरू केल्या आणि त्याला हजारो काँमेेटस्, लाखो लाईक्स्च्या माध्यमातून प्रतिसादही देत आहे. आई, बहीण, पत्नी आणि समाजातील इतर महिलांकडे बघण्याची नवी सकारात्मक द‍ृष्टी सोशल मीडियानेच आजच्या पिढीला दिली आहे.

सोशल मीडियावर केवळ चकाट्या पिटणारेच नाहीत. याठिकाणी छोट्या-मोठ्या विविध क्षेत्रातील व्यावसायिकांचे अनेक गु्रप्स् आहेत.  महिला नव उद्योजकांना प्रेरणा देणारे, नोकरी, वैयक्‍तिक समस्यांवर मोफत मागदर्शन करणारे शेकडो हेल्पिंग हँन्डस्  सोशल मीडियातून पुढे आले आहेत.   जाती-पाती तोडो, भारत जोडो हे अभियान तर सोशल मीडियावर कमालीचे यशस्वी झालेले दिसते.  एखाद्या संवेदनशील मुद्द्यावर  चर्चा झडत असताना राष्ट्रीयत्वाच्या नजरेतून अशा प्रश्‍नांकडे बघणार्‍यांची आणि भिडणार्‍यांची संख्या खूप मोठी दिसते. दोस्तांनो,  सोडून द्या, पुढे चला असं मैत्रीने सांगणारेही अनेकजण असतात.  नो करप्शन, न्यू ऑप्शन अशी संकल्पना घेऊन मध्यंतरी तरुणांकडून भ्रष्ट व्यवस्था संपवण्यासाठी थेट भूमिका घेतली  होती. ज्या सरकारी कार्यालयात कामासाठी  लाच दिली आहे, अशांची नावे जाहीर करा, असे आवाहनच करण्यात आले होते. लाच देऊ नकाच पण चुकून दिली असेल तर ती जाहीर करा, ही सोशल मीडियावरील भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला व्यापक बळ मिळाले होते.   

 एकमेकांशी वाद घालण्यापेक्षा सोपे आणि परवडणारे शोध लावा आणि जगाला सांगा असं आवाहन करणारी  युथ चळवळ तर सोशल मीडियावर दररोज लोकप्रियतेचा एकएक टप्पा पादाक्रांत करीत हजारोंना आपल्याशी कनेक्ट करीत पुढे चालली आहे.   सोशल मीडियावरील हे चित्र खूपच  आश्‍वासक आहे. या तरुणांचा द‍ृष्टीकोन  सकारात्मक आहे. मानवतावादी आहे. कोण काहीही करू दे आपण मात्र चांगलं, उदात्तच करत राहणार असा त्यांना नारा दिसतो. राजकारणविरहीत आणि जाती-धर्म विरहीत ही तरुणाईची आश्‍वासक चळवळ दिवसेंदिवस वाढत जात आहे.