Tue, Mar 26, 2019 21:54होमपेज › Kolhapur › पैशाचा पाऊस पडलाच नाही!; तिसरा मांडूळ सापडला मृतावस्थेत

पैशाचा पाऊस पडलाच नाही!; तिसरा मांडूळ सापडला मृतावस्थेत

Published On: Feb 21 2018 1:12AM | Last Updated: Feb 21 2018 1:04AMकोल्हापूर : प्रतिनिधी

दुर्मीळ प्रजातीच्या दोनतोंडी मांडुळांची तस्करी करणार्‍या टोळीकडून तिसरा मांडूळ मंगळवारी मृतावस्थेत आढळून आला. प्लास्टिकच्या डब्यात मृत्यू झाल्याने बांबवडे-मलकापूर मार्गावरील बजागवाडी गावाजवळील ओढ्यात साप फेकून देण्यात आला होता. वनक्षेत्रपाल पी. एस. पाटील यांच्या उपस्थितीत मृतावस्थेतील मांडूळ ताब्यात घेण्यात आला.

सापाचा गुदमरून मृत्यू झाला की संशयितानी भीतीपोटी मारून टाकला? याची कसून चौकशी सुरू आहे, असे करवीरचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव व तपासाधिकारी प्रशांत माने यांनी सांगितले.

संशयितानी यापूर्वीही मांडुळाची तस्करी केली असावी, असा संशय आहे. संबंधितांच्या कब्जात आणखी एक मांडूळ प्रजातीचा साप आहे, अशी माहिती मिळाली आहे. त्याद‍ृष्टीने संशयिताकडे चौकशी सुरू आहे, असेही जाधव म्हणाले.

दोनतोंडी मांडुळाच्या तस्करीप्रकरणी करवीर पोलिसांनी टोळीचा म्होरक्या हिंमत जयवंत पाटील, संजय मारुती जाधव व पंकज उत्तम पाटील यांना अटक करून दोन जिवंत मांडूळ, एक दुचाकी, दोन चार चाकी वाहनासह सुमारे 15 लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे.

 संशयितांपैकी संजय जाधव हा नावलीपैकी धारवडी (ता. पन्हाळा) ग्रामपंचायतीचा विद्यमान उपसरपंच असल्याने मांडूळ तस्करीच्या तपासाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जाधवला अटक झाल्याने पन्हाळा तालुक्यात दिवसभर उलटसुलट चर्चा चालू होती. मांडूळ तस्करीची पोलिसांनी खोलवर चौकशी करून दोषीवर कठोर करावी, अशी मागणी ग्रामस्थातून होऊ लागली आहे.

पोलिस निरीक्षक जाधव म्हणाले, म्होरक्या हिंमत पाटीलने दि.16 फेब्रुवारीला शिरवळ (पुणे) येथील वीटभट्टीचे काम करणार्‍या संतोष नामक मित्राकडून तीन मांडूळ साप ताब्यात घेतले. हिंमतने सहकारी मित्र जाधव यांच्याशी संपर्क साधून गिर्‍हाईक शोधण्याची सूचना केली. जाधवने सांगलीतील लोकरे नामक व्यक्‍तीशी संपर्क साधला. 

लोकरे यांनी मांडूळ साप घेऊन कुडित्रे (ता. करवीर) येथे येण्यास सांगितले. मांडुळाच्या तस्करीची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी पोलिस निरीक्षक दिलीप जाधव व गुन्हे प्रगटीकरण पथकाला कारवाईचे आदेश दिले.त्यानुसार सापळा रचून पथकाने दोन जिवंत मांडुळासह तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले.

पैशाचा पाऊस पडलाच नाही!

अघोरी कृत्य एव्हाना तंत्र-मंत्राच्या आधारे मांडुळाची पूजा केल्यास घरात पैशाचा पाऊस पडतो. अशी म्होरक्याने साथीदारांची केली होती. मिळणार्‍या उत्पनातून समान वाटा घेण्याचे त्याच्यात ठरले होते. मात्र, व्यवहारापूर्वीच संशयित पोलिसांच्या जाळ्यात सापडले आणि पैशाच्या राशीऐवजी रात्र पोलिस ठाण्यात जागून काढावी लागली.