Sun, Feb 23, 2020 03:52होमपेज › Kolhapur › सापांना सांभाळून 'जीवदान' देणारा कोल्हापुरचा 'अवलिया'

सापांना सांभाळून 'जीवदान' देणारा कोल्हापुरचा 'अवलिया'

Published On: Aug 19 2019 4:50PM | Last Updated: Aug 19 2019 4:50PM

सिद्धेश टोणपे पकडलेल्या सापासहकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

सापाचे नाव जरी घेतले, तरी जीवाचा थरकाप उडतो. त्यातही काहीवेळा सापाने दंश केल्यास केवळ त्याच्या भीतीनेच उपचारापूर्वीच अनेकजण गार होतात अशी परिस्थिती आहे. कोल्हापुरात अवघ्या २२ वर्षाचा असा अवलिया आहे जो सापांना सुरक्षित पकडतोच, पण पकडलेल्या सापांना घरी आणून त्यांची काळजी घेऊन कालातरांने उचित ठिकाणी सुरक्षित सोडून देतो. त्याचे नाव आहे सिद्धेश टोणपे. कोल्हापुरातील सानेगुरुजी वसाहतीमध्ये तो वास्तव्यास आहे. 

सिद्धेशला लहानपणापासून सापांची माहिती गोळा करण्याचा तसेच त्यांचा अभ्यास करण्याचा छंद आहे. सिद्धेशने बारावीमध्ये पीसीएमबी विषय घेऊन उत्तीर्ण झाल्यानंतर सापांचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी अमेरिका गाठली. त्याने अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठात 'स्नेक नॉलेज ॲन्ड मेडिसीन मेकिंग प्रोफेशनलीझम इन वाईल्ड लाईफ'ची पदवी संपादन केली. तो अभ्यासक्रम सहा वर्षाचा आहे. 

पदवी पूर्ण केल्यानंतर त्याला सापांवर अधिक संशोधन करण्यासाठी तेथेच नोकरीची ऑफर आली. सिद्धेशने आलेल्या ऑफरला विनम्रपणे नकार देत मायदेशी परतला. सिद्धेशकडे सर्प हाताळण्यासाठी तसेच संशोधन करण्यासाठी भारत सरकारचे अधिकृत लायसन आहे. गेल्या एक वर्षापासून सिद्धेशने शेकडो सर्पांना पकडून जीवदान दिले आहे. त्याचबरोबर सापांवर संशोधन करत आहे. 

कोल्हापुरात महापुराने अस्मानी संकट ओढवले. शहराच्या अनेक भागांना तळ्याचे स्वरुप आले. ग्रामीण भागात तर दैनाच करून टाकली. पुराचे पाणी ओसरल्यानंतर अनेक ठिकाणी सापांनी हैदोस घातला. काहींच्या घरात, कपाटात, कपड्यात, रस्त्यात, तर कधी झाडांवर साप आढळून आले. त्यामुळे जिवितहानी होऊ नये म्हणून  जिल्हा प्रशासनाकडून सर्पमित्रांची यादीच जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये सिद्धेशचा समावेश होता. 

सिद्धेशने दोन आठवड्यात तब्बल २९६ साप पकडून त्यांना जीवदान दिले. सिद्धेशने सापांना हाताळण्यासाठी घरी काचेच्या खास पेटी निर्माण केल्या आहेत. यामध्ये सुरक्षितपणे सापांना ठेवून त्यांची काळजी घेत असतो. महापुराच्या कालावधीत पकडण्यात आलेले साप राधानगरी अभयारण्यासह विविध सुरक्षित ठिकाणी सोडून देण्यात आले. 

महापुराच्या कालावधीत पकडलेल्या सापांमध्ये अनेक नवीन सापांची माहिती मिळाल्याचे सिद्धेशने पुढारी ऑनलाईनशी बोलताना सांगितले. त्याला कसबा बावड्यातील अशांक मोरेचीही चांगली मदत झाली.त्याने  ७९ साप पकडून जीवदान दिले. प्रदीप सुतारने ९० साप पकडले. दोन आठवड्यात या सर्वांना शेकडो साप घरी आल्याचे फोन्स आले. 

सीपीआर, जिल्हा परिषद, वनविभाग तसेच अग्नीशमनच्या मदतीसाठी सिद्घेश केव्हाही धावून जातो. या सर्वांकडून दिवसभरात अनेक कॉल्स सिद्धेशला येत असतात. या सर्वांसोबत सिद्धेश समन्वय साधून कोणत्याही मोबदल्याविना काम करत आहे. सीपीआरमध्ये संर्पदंश झालेला रुग्ण आल्यानंतर कोणत्या प्रकारचा सापाने दंश केला आहे, याची विचारणा करण्यासाठी सिद्धेशला फोन येत असतात.