Sat, Jul 20, 2019 09:03होमपेज › Kolhapur › ‘सर्पदंशा’साठी नुकसानभरपाई द्या

‘सर्पदंशा’साठी नुकसानभरपाई द्या

Published On: Apr 15 2018 1:33AM | Last Updated: Apr 15 2018 12:27AMकोल्हापूर : अनिल देशमुख

सर्पदंश झाल्यानंतर बाधिताला नुकसानभरपाई द्यावी, असा प्रस्ताव शासन नियुक्त समितीने केला आहे. हा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला जाणार आहे. शुक्रवारी असा प्रस्ताव सादर करण्याबाबत समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

सर्पदंशाने मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या अधिक आहे. ग्रामीण भागात याचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. सर्पदंशाने मृत्यू आलेल्यांत शेतकर्‍यांची संख्या अनेकदा जास्त असल्याचे चित्र राज्यात आहेे. सर्पदंशाने घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. 

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास संबंधिताच्या कुटुंबीयांना भरपाई मिळते. मात्र, सर्पदंशाने मृत्यू झाल्यास अथवा जखमी झाल्यास संबंधिताला किंवा त्याच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची तरतूद नाही. यामुळे सर्पदंश होऊन मयत झालेल्या शेतकर्‍यांचे कुटुंब उघड्यावर पडल्याचेही चित्र अनेकदा पहायला मिळते. राज्य शासनाने वन्यप्राण्याचे उपद्रव थांबवणे व पिकांचे नुकसान देण्यासाठी समिती नेमली आहे. या समितीच्या बैठकीत सर्पदंशाने होणार्‍या मृत्यूबाबत चर्चा झाली. यानंतर सर्पदंश झालेल्या व्यक्तीलाही नुकसानभरपाई द्यावी, असा प्रस्ताव राज्य शासनला सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा प्रस्ताव राज्य शासनाने मान्य केला तर सर्पदंशाने उघड्यावर पडणार्‍या शेतकर्‍यांच्या संसाराची आर्थिक घडी पुन्हा नीट बसवण्यासाठी काही प्रमाणात हातभार लागणार आहे.

सर्प हा देखील वन्य आणि संरक्षित प्राणीच आहे. सर्पदंशाने मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे, त्यात शेतकर्‍यांची संख्या अधिक आहे. यामुळे सर्पदंशाने मृत्यू झाल्यास नुकसानभरपाई देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे, त्याचा शासन दरबारी पाठपुरावा केला जाईल. 
-आ. प्रकाश आबिटकर