Mon, Nov 19, 2018 23:06होमपेज › Kolhapur › कोवळ्या सत्यमचा सर्पदंशाने अंत

कोवळ्या सत्यमचा सर्पदंशाने अंत

Published On: Jun 02 2018 2:01AM | Last Updated: Jun 02 2018 1:57AMकोल्हापूर : प्रतिनिधी

धाकल्या बहिणीशी खेळत असताना सर्पाने दंश केल्याने सत्यम संजय प्रभू (वय 4, रा. घानवडे, ता. करवीर) या चिमुरड्याचा अवघ्या तासाभरात मृत्यू झाला. घानवडे (ता. करवीर) येथे शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. मनाला चटका लावणार्‍या घटनेमुळे घानवडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोवळ्या मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने अंगणवाडी शिक्षिका असलेली आई आणि सेंट्रिंग कामगार वडील संजय प्रभू यांचा आक्रोश मन हेलावणारा होता. शुक्रवारी सकाळी आई सुवर्णा यांच्यासमवेत मुलगी तनुजा, मुलगा सत्यम अंगणवाडीत गेले होते.  शाळेतील काम आटोपून साडेअकरा वाजता तिघेही घराकडे परतत होते. आई पुढे आणि दोघे भावंडे मागे होते. घरापासून काही अंतरावर सत्यमचा सापाच्या शेपटीवर नकळत पाय पडला. त्याचक्षणी सर्पाने सत्यमला दंश केला.

 सर्पदंश झाल्यानंतर सत्यम रडत घराकडे पळत सुटला. साप चावल्याचे त्याने आईला सांगितले. आईनेही शेजार्‍यांच्या मदतीने हसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. प्राथमिक उपचारानंतर सत्यमला सीपीआरमध्ये नेण्याचा निर्णय झाला. वाटेतच सत्यमची प्रकृती गंभीर बनली.  शासकीय रुग्णालयात त्याला आणले. तथापि, उपचारापूर्वीच सत्यमचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
सत्यमचा मृत्यू झाल्याचे समजताच आईने हंबरडा फोडला. वडिलांसह नातेवाईकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या होत्या. कावरीबावरी झालेली तनुजाही आईला बिलगून अश्रू ढाळत होती. सत्यमचा मृत्यू झाल्याचे समजताच ग्रामस्थांनीही सीपीआरकडे धाव घेतली.