Wed, Jul 17, 2019 18:24होमपेज › Kolhapur › गॅस सिलेंडरचा स्‍फोट, १० जण जखमी 

गॅस सिलेंडरचा स्‍फोट, १० जण जखमी 

Published On: May 30 2018 4:22PM | Last Updated: May 30 2018 4:26PMशिये : वार्ताहर

पुलाची शिरोली (ता. हातकणंगले ) येथील हौसिंग सोसायटीमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात एक लहान मुलगी, दोन महिलांसह दहा जण जखमी झाले आहेत. यापैकी दोघे गंभीर जखमी आहेत. या जखमींवर शासकीय व खाजगी दवाखान्यात उपचार  सुरु आहेत , घटना स्थळास पोलिस अधिक्षक संजय मोहिते व अप्पर पोलिस अधिक्षक बालाजी काकडे यांनी भेट दिली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, काडगोंड कुटुंब हे कृष्णात पाटील यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत आहेत . निल्लवा काडगोंड या सकाळी स्वयंपाक करण्यासाठी गॅस सुरू करत होत्या. पण सिलिंडर संपल्याने त्यांनी घरमालकीन सौ. पाटील यांना बोलाविले. त्यांनी सिलिंडर जोडून दिले व त्या निघून गेल्या. त्यानंतर सौ. निल्लवा यांनी गॅस सुरू केला.

दरम्यान गॅसचा वास येउ लागला. गॅसचा वास येत असल्‍याने ईमारतीच्या  वरच्या मजल्यावर राहणारे सर्वजण धावत खाली आले. त्यांनी सौ. निल्लवा यांच्या स्वयंपाक घरात प्रवेश करुन गॅस कनेक्शन बंद करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी शेगडीशी जोडलेल्या सिलिंडरचा अचानक स्फोट झाला.  हा स्फोट इतका जोरदार होता की, त्‍याचा आवाज दोन किलोमीटरच्या परिसरात ऐकू आला.

या सिलेंडरच्या स्‍फोटानंतर पोलिसांकडून शिरोली परिसरातील गॅस वितरण कंपन्यांची चौकशी करण्यात येत आहे. यानंतर  घटनास्थळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव, सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी भेट दिली. दरम्‍यान या सिलेंडरच्या स्‍फोटानंतर परिसरात नागरिकांनी घटनास्‍थळी मोठ्‍या प्रमाणात गर्दी केली होती.