Wed, Mar 20, 2019 12:45होमपेज › Kolhapur › ‘सप्लिमेंट बॉडी’ बेततेय तरुणाईच्या जीवावर 

‘सप्लिमेंट बॉडी’ बेततेय तरुणाईच्या जीवावर 

Published On: Aug 29 2018 1:42AM | Last Updated: Aug 29 2018 12:47AMकोल्हापूर : विजय पाटील 

महिन्याभरात माझ्या दंडाचा आकार (बायसेफ, ट्रायसेफ) पायाच्या मांडीएवढा दिसला पाहिजे. टी शर्टमधून छातीचा पिळदारपणा डोकावला पाहिजे या वेड्या हट्टाने काही तरुण सप्लिमेंट पावडर आणि  स्टेरॉईडचे ओव्हरडोस घेऊन शरिराचा खेळखंडोबा करू लागले आहेत. अशी दोन-चार महिन्यांत पिळदार बॉडी बनवता येत नाही हे या चुकीच्या माहितीवर भरटकटलेल्या तरुणांना सांगायला हवे. कारण  ‘सप्लिमेंट बॉडी’च्या ओव्हरडोस ने अनेकांना जीवघेण्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. 

मंक्याने त्याच्या ग्रुपला कॉलेजमध्ये ओपन चॅलेंज दिले की तीन महिन्यांत ‘टायगर’ सारखी बॉडी बनवतो. चॅलेंज दिलेल्या पाचव्या दिवशी मंक्याची पाठ दुखत असल्याने तो हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. सगळे मित्र त्याला बघायला गेलेत. मंक्यासारखी प्रेम्याची गत झाली आहे. त्याच्या लिव्हरची सुज कमी होत नसल्याने तो फक्‍त फळांच्या रसावर भूक भागवत आहे. परवा तर आब्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. नावे बदललेली परंतु ही सध्याची खरी उदाहरणे आहेत. या तीघांचे वय आहे 16, 17 व 19 इतके कमी. वय कमी असल्याने साहजिकच शरीर तुलनेने बारीक दिसणारे. मुळात हे तीघेही तसे फिट अँड फाईन असे जगत होते. त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन व्यायाम आणि योग्य आहार घेतला असता तर त्यांची तब्येत हळूहळू पिळदार बनत गेली असती. पण यांना महिना-दोन महिन्यांत बॉडी पाहिजे होती. मग अर्धवट माहिती असणार्‍याने यांना सप्लिमेंट आणि स्टेरॉईड खाण्याचा सल्ला दिला. झालं यांच्या घोड्यानं इथचं पेंड खाल्ली. शरिराला न पेलवणारा व्यायाम आणि चुकीच्या रेडीमेड प्रोटीन्समुळे यांची बॉडी बनण्याऐवजी आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला.

कोल्हापूर शहर आणि जिल्हा लाल मातीच्या तालमींचा आहे. घाम गळेपर्यंत जोर बैठका मारुन दूध, तूप, केळी आणि घरची भाजीभाकरी खाऊन पहाडासारखे राकट शरीरसंपदा कमावणार्‍यांची संख्या येथे तुलनेने जास्त आहे. एका आठवड्यात अभ्यास करून जसे परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळत नाहीत. तसेच दोन-चार महिन्यांत पिळदार शरीर तयार होत नाही हे समजून घेण्याची गरज आहे. शरीर काही खेळणं नाही. पिळदार शरीर बनवण्यासाठी त्याला योग्य वेळ द्यायला हवा. कारणनुसते सप्लिमेंट बॉडी बिल्डर म्हणजे पेंढा भरलेल्या वाघासारखे असतात.फिटनेसहा व्यायामाचा मुख्य हेतू यातून साध्य होत नाही. त्यामुळेच तरुणाईने व्यायाम करायलाच हवा पण योग्य सल्ला घेऊन.