Tue, Apr 23, 2019 23:33होमपेज › Kolhapur › श्रावणाची चाहूल, सणासाठीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी

श्रावणाची चाहूल, सणासाठीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी

Published On: Aug 11 2018 1:20AM | Last Updated: Aug 10 2018 11:08PMकोल्हापूर : प्रतिनिधी

सोनउन्हाचे ध्वज उंचावत श्रावण येतो आहे....,
झुलवित हिरवी स्मिते तरुंवर श्रावण गातो आहे....

रविवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे. त्यापूर्वीच निसर्गाने श्रावण महिन्याची चाहूल दिली आहे.  ऊन-पावसाचा खेळ सुरू झाल्याने श्रावण महिना सुरू झाल्याचा आभास होऊ लागला आहे. श्रावण सोमवार, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी असे अनेक सण घेऊन येणार्‍या श्रावण महिन्यासाठी बाजारात विविध वस्तूंनी गर्दी केली आहे.

निसर्गसौंदर्याने बहरणार्‍या या महिन्याला धार्मिक सण, उत्सवांची किणार असल्याने सुका मेवा, फळफळावळ, हरिव्यागार भाज्या, उपवासाचे पदार्थ, धार्मिक सणांसाठी लागणार्‍या पूजेच्या वस्तूंपासून सगळ्या वस्तूंची बाजारात गर्दी झाली आहे.

व्रतवैकल्ये आणि पूजा साहित्य

श्रावण महिना सुरू झाला की सर्वजण श्रावण सोमवारच्या व्रताच्या तयारीला लागतात. हिंदू धर्मात श्रावण महिना पवित्र मानला जात असल्याने या महिन्यात सोमवारसह अनेक व्रतवैकल्ये व धार्मिक पूजापाठ केले जातात. श्रावण सोमवारचा उपवास, एकवेळ जेवण करून श्रावणी, श्रावणातील मंगळवार, शुक्रवारपासून प्रत्येक महत्त्वाचा दिवस व्रतवैकल्याने साजरा होतो.  

पूर्वी श्रावण महिना जवळ आला की घराघरांत कापसाच्या वाती वळणे, पोवती करणे आदी कामात स्त्रिया व्यस्त असायच्या. पण आजकाल यासाठी लागणार्‍या कापसाच्या वाती, पवती, पूजेचे, धार्मिक ग्रंथ, व्रतवैकल्याची पुस्तके व अन्य साहित्य बाजारात सहज मिळते.

श्रावण महिन्यात शहरी भागासह ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी पारायण सोहळे, अखंड हरिनाम सप्ताह, अखंड वीणा मास राबवण्याची प्रथा आहे. याबरोबरच संपूर्ण महिना उपवास, एकवेळ जेवण, चपलांचा त्याग, केश वपन न करणे अशा प्रत्येक कुटुंबात असलेल्या परंपरागत चाली-रीतींनुसार श्रावण साजरा केला जातो. श्रावण सुरू होत असून, निसर्ग सौंदर्य घेऊन येणार्‍या या महिन्याच्या स्वागताची घरोघरी तयारी सुरू झाली आहे.