Sun, Mar 24, 2019 04:42होमपेज › Kolhapur › राजर्षी शाहू महाराजांना ‘भारतरत्न’ द्यावा

राजर्षी शाहू महाराजांना ‘भारतरत्न’ द्यावा

Published On: Mar 18 2018 1:29AM | Last Updated: Mar 18 2018 1:23AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य समता आणि सलोखा राखणारे आहे. अस्पृश्य निवारण, महिला अत्याचारबंदी, सक्‍तीचे शिक्षण, जल व्यवस्थापन असे सर्वच क्षेत्रांत राजर्षी शाहूंनी मोलाचे कार्य करून ठेवले आहे. त्यामुळे राजर्षी शाहू या लोकराजांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारी ‘भारतरत्न’ ही मरणोत्तर पदवी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने प्राचार्य डॉ. आय. एच. पठाण, डॉ. कविता गगराणी, डॉ. चंद्रकांत कुरणे आणि शिवाजी पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेतून केली. 

प्राचार्य डॉ. पठाण म्हणाले, राजर्षी शाहू राजांनी जे करून ठेवले आहे ते काळाच्या पुढचे महान काम आहे. त्यांनी कृतीतून समाज बांधणीचे काम केले आहे. त्यांचे विचार हे समता आणि बंधुता निर्माण करणारे आहेत. देशाला आज याच विचारांची गरज आहे. तरुणांना या विचारांची प्रेरणा आवश्यक आहे. ब्रिटिशांविरोधातील स्वातंत्र्यलढ्यासाठी त्यांनी शिवाजी क्‍लब तसेच  लोकमान्य टिळक यांच्या नेपाळ येथील कारखान्यास आर्थिक व सर्वतोपरी मदत करून योगदान दिले. डॉ. कुरणे म्हणाले, शाहू महाराज हे दूरद‍ृष्टीचे होते. त्यांनी जातीय निर्मूलन भाषणातून नव्हे तर कृतीतून केले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मूकनायक हे वर्तमानपत्र काढण्यासाठी आर्थिक मदत केली. सर्व समाजांच्या कल्याणासाठी त्यांनी काम केले आहे. डॉ. कविता गगराणी म्हणाल्या, शाहू महाराजांचा स्त्री शिक्षणाबद्दल व्यापक द‍ृष्टिकोन होता. त्यांनी विधवा पुनर्विवाह कायदा 1917 साली तर स्त्रियांवर अन्याय निर्मूलन कायदा 1919 साली केला. त्यांच्या सर्वंकष कार्याची दखल घेऊन केंद्र सरकाररने ‘भारतरत्न’ द्यावे. सध्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षस्थानी महिला प्रतिनिधी आहेत. या दोन्ही सभागृहात ‘भारतरत्न’ मागणीचा ठराव करण्यात यावा.

जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व हरियाणा या राज्यांत आम्ही याबाबत लोकचळवळ उभा करणार आहोत. राज्य सरकारनेही तसा ठराव करून केंद्र सरकारकडे  पाठवावा, अशी आम्ही लोकप्रतिनिधींना भेटून मागणी करणार आहोत. यावेळी वैभव घोरपडे, दिग्विजय मोहिते, शशिकांत नलवडे, प्रमोद बोंडगे, किरण साळुंखे, अभिषेक पाटील, उदय पाटील आदी उपस्थित होते.

URL : should, give, Bharat Ratna, Rajshree Shahu Maharaj, kolhapur news