Wed, Jul 24, 2019 12:32होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : ‘शिवशाही’ला अपघात; चालकासह तेरा जखमी

कोल्‍हापूर : ‘शिवशाही’ला अपघात; चालकासह तेरा जखमी

Published On: Jun 17 2018 8:59PM | Last Updated: Jun 17 2018 8:59PMकोल्हापूर/उजळाईवाडी ः

पुणे-बंगळूर महामार्गावर कणेरीवाडीनजीक चालकाचा ताबा सुटून शिवशाही बसने रस्त्याकडेला असणार्‍या टेकडीला धडक दिली. यामध्ये चालकासह तेरा प्रवासी जखमी झाले. सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाल्यामुळे वाहतूक तासभर विस्कळीत झाली होती. ही बस चंदगडहून बोरिवलीकडे जात होती. 

चंदगड-बोरिवली शिवशाही साडेपाचच्या सुमारास चंदगडमधून निघाली होती. गडहिंग्लजमार्गे कोल्हापुरात येत असताना कणेरीवाडीनजीक चालक अतुल जगताप याचा बसवरील ताबा सुटला. बस रस्ता सोडून बाजूच्या टेकडीला धडकली. यामध्ये प्रवासी प्रथमेश गंगाराम वेसणे (वय 17), विष्णू बापू रेडेकर (56), पद्मा विष्णू रेडेकर (49), दीपाली दिलीप पिळणकर (30), दिलीप लक्ष्मण पिळणकर (55, रा. चंदगड), रोहन श्रीकांत मूर्ती (26, गडहिंग्लज), श्रद्धा तानाजी कोकीतकर (23), सुनीता तानाजी कोकीतकर (43), तानाजी आप्पा कोकीतकर (58, रा. मुंबई), प्रसाद धनाजी अर्दाळकर (30, ठाणे), सुरेश शंकर रेडेकर (52, मुंबई), राणी रामचंद्र सूर्यवंशी (32, रा. उचगाव) अशी जखमींची नावे आहेत.

जखमींना आणले केएमटीतून 

अपघातानंतर रुग्णवाहिकेतून केवळ दोनच जखमींना नेता येत होते. यामुळे इतर जखमींना केएमटीतून सीपीआरकडे पाठविण्यात आले. कागल-आपटेनगर केएमटीचे चालक गजानन हेगडे व वाहक भिकाजी शिंदे यांनी इतर जखमींना केएमटी बसमधून सीपीआरमध्ये दाखल केले. 

वाहतूक ठप्प

अपघातानंतर बसने अर्धा रस्ता व्यापला होता. यामुळे एका बाजूची वाहतूक ठप्प झाली. अपघातापासून शंभर मीटर अंतरावर कागलकडून येणारा ट्रक रस्ता दुभाजकला धडकून आणखीन एक अपघात घडला. या दोन्ही घटनांमुळे महामार्गावरील वाहतूक तासभर विस्कळीत झाली.