Sun, Jul 21, 2019 06:29होमपेज › Kolhapur › पाचगाव, गांधीनगरसह 13 गावांची पाणी दरवाढ रद्द करा

पाचगाव, गांधीनगरसह 13 गावांची पाणी दरवाढ रद्द करा

Published On: Jan 17 2018 1:57AM | Last Updated: Jan 16 2018 11:38PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

करवीर तालुक्यातील गांधीनगर, पाचगावसह 13 गावांत पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला असतानाही घरगुती वापराच्या पाणी दरात शासनाने प्रतिहजार लिटरमागे साडेतीन रुपये वाढ केली आहे. याच्या निषेधार्थ मंगळवारी शिवसेनेच्या वतीने कावळा नाका परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. 

यानंतर कार्यकारी अभियंता एन. बी. भोई यांना निवेदन देण्यात आले. पाणी दरवाढ तातडीने रद्द करावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. 
सुनावणी न घेता पाणी दरवाढ करणार्‍या शासनाचा धिक्कार असो, पाणीपट्टी दरवाढ रद्द झालीच पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. गांधीनगर, वळीवडे, उचगाव, पाचगाव, मोरेवाडी यासह तेरा गावांसाठी ही पाणी योजना आहे. या योजनेतील पाण्याचा दर प्रतिहजार लिटरसाठी 12 रुपये होता; त्यात 7 रुपयांनी वाढ केली. या विरोधात या 13 गावांतील दोन हजार नागरिकांनी हरकती नोंदवल्या होत्या. या हरकतींची सुनावणी होणे आवश्यक होते; पण तसे झाले नाही. 

पाणीपुरवठा खात्याने परस्पर निर्णय घेऊन दरात 3 रुपये 50 पैशांनी कपात केली. यामुळे 15.50 रुपयांप्रमाणे दर बसणार आहे; पण कागल  व गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत प्रतिहजार लिटर पाण्याचा दर 15 रुपये आहे. मग घरगुती वापराच्या पाण्याचा दर 15 रुपये 50 पैसे कसा, असा सवाल करून ही दरवाढ आम्हाला मान्य नाही, प्रतिहजार लिटर 10 रुपये याप्रमाणे दर घ्यावा, अशी आमची मागणी आहे.  

मागणी मान्य झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा देण्यात आला आहे. 
जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सुजित चव्हाण, शिवाजी पाटील, राजू यादव, विनोद खोत, विराज पाटील, दुर्गेश लिंग्रस, रवी चौगले, हर्षल सुर्वे, शशिकांत बिडकर महिला पदाधिकारी, शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.