होमपेज › Kolhapur › अनाठायी बोलू नका, फुगा फुटतो

अनाठायी बोलू नका, फुगा फुटतो

Published On: Aug 20 2018 1:37AM | Last Updated: Aug 19 2018 11:53PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापुरातील लोकसभेच्या दोन्ही जागा व विधानसभेच्या दहा जागा शिवसेनाच जिंकेल, असे अनाठायी काही बोलू नका. फुगा जास्त फुगला की तो फुटतो, त्यामुळे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हॅट्ट्रिकसाठी सर्वांनी एकसंधपणे काम करा, असा सल्ला परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी कार्यकर्त्यांना दिला. 

पक्षाच्या पश्‍चिम महाराष्ट्राच्या संपर्कनेतेपदी रावते यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व कार्यकर्ते, पदाधिकारी मेळावा अशा संयुक्‍त कार्यक्रमात ते बोलत होते. केशवराव भोसले नाट्यगृहात कार्यक्रम झाला. 

ते म्हणाले, संघर्ष करण्यासाठी शिवसैनिक नेहमी तयार असतो. शिवसैनिक हे नाव विकाऊ नाही, तर टिकाऊ आहे. शिवसैनिक हाच पक्षात नेता आहे. आक्रमकता कोणासाठी आणि कशासाठी दाखवायची, हे तुमच्या हातात आहे. जनतेसाठीच लढायचे, हे शिवसैनिकाला माहिती पाहिजे. आपले कर्तृत्व पाहून विरोधकांनाही आपल्यासमोर सामर्थ्यवान व्यक्‍ती उभा आहे असे वाटले पाहिजे, असे काम क्षीरसागर यांचे आहे. 

महाराष्ट्रात सामाजिक क्रांती घडवण्याच्या कामाचे नेतृत्व शिवसेनेने केले; पण सत्तेत गुजरातचे लोक बसलेत, असा टोला लगावत रावते म्हणाले, आपल्या प्रत्येक कृतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार दिसला पाहिजे. त्यात टीका झाली तरी ती सकारात्मकपणे स्वीकारली तर तुम्ही फार मोठे व्हाल.

जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले, प्रत्येक पक्षात छोटे-मोठे मतभेद हे असतातच. निवडणूक लागली आणि पक्षप्रमुखांचा आदेश आला की, सर्व एकत्र येतील आणि हा किल्ला पुन्हा मजबूत करतील.

आमदार क्षीरसागर म्हणाले, 2004 नंतर सेना संपली, अशा वल्गना काहींनी केल्या; पण 2009 ला 3 व 2014 ला तब्बल सहा आमदार सेनेचे झाले. अलीकडे कार्यकर्त्यांना विकत घेण्याचा प्रकार सुरू आहे; पण एकही शिवसैनिक असल्या प्रकाराला बळी पडला नाही. अलीकडे सेनेच्या कार्यकर्त्यांवर दबाव टाकण्याचा, त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्याचा प्रकार सुरू आहे, तो खपवून घेतला जाणार नाही. 

सेनेचे उपनेते प्रा. नितीन बानगुडे-पाटील म्हणाले, एक पाय जनसमुदायात व एक पाय प्रगतीत असल्यामुळेच आमदार क्षीरसागर यांची हॅट्ट्रिक निश्‍चित आहे. मराठी माणसाची अस्मिता 52 वर्षे स्वतःच्या विचारावर मजबूत ठेवणे ही महाराष्ट्रात शिवसेनेची जमेची बाजू आहे.  प्रास्ताविक पदमाकर कापसे यांनी केले. यावेळी दिपक गौड, एसटी कामगार सेनेचे जितेंद्र इंगवले, माजी नगरसेवक सुनिल मोदी, माजी उपमहापौर उदय पोवार यांची भाषणे झाली. व्यासपीठावर माजी नगरसेवक रविकिकरण इंगवले, सौ. वैशाली क्षीरसागर, नगरसेवक नियाज खान, पदमा उत्तुरे, ऋतुराज क्षीरसागर आदि उपस्थित होते. 
शिंदे-होळकरांमुळे पानिपत हरले मराटे पानिपतची लढाई शिंदे-होळकर यांच्यामुळे हरले. त्यामुळे पक्षात जे शिंदे-होळकर नाराज आहेत, त्यांची नाराजी दूर करण्याचे काम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतील, असे सांगत रावते यांनी दोन्ही जिल्हाप्रमुख पक्षासाठी झटतील असे सांगितले.