Sun, Mar 24, 2019 11:04होमपेज › Kolhapur › #MeToo ही स्त्रियांच्या आत्मसन्मानाची, सुरक्षिततेची मोहीम :  डॉ. नीलम गोऱ्हे  

#MeToo ही स्त्रियांच्या आत्मसन्मानाची, सुरक्षिततेची मोहीम :  डॉ. नीलम गोऱ्हे  

Published On: Oct 11 2018 7:27PM | Last Updated: Oct 11 2018 7:29PMकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

महिलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या #MeToo या मोहिमेचे शिवसेनेच्या प्रवक्त्या, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी समर्थन केले आहे. 

'मी टू' या मोहिमेच्या माध्यमातून काही वर्षानंतर स्त्रियांनी आपल्या मनातील अस्वस्थता व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. 'मी टू' च्या अगोदर स्त्रियांनी आत्मचरित्रातून, मनोगतातून आपल्यावरील अन्यायावरील वाचा फोडली आहे. आता 'मी टू' नाव असले तरी स्त्रियांच्या आत्मसन्मानाची, प्रतिष्ठेची, सुरक्षिततेची ही मोहीम आहे, असे डॉ. गोऱ्हे यांनी कोल्हापुरात बोलताना म्हटले आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी आज अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी 'मी टू' मोहिमेवर आपली भूमिका स्पष्ट केली. केंद्रीय महिला आयोग सांगतो की महिलांनी तक्रारी द्याव्यात. परिस्थितीजन्य पुराव्यातून दोषी कोण हे समोर येईल. तसेच गैरवापर झाला असेल तर चौकशातून स्पष्ट होईल, असे त्यांनी नमूद केले आहे.

प्रत्येक गोष्टीमध्ये काही वर्षानंतर तपशील शोधणे अवघड आहे. तरीही सध्याच्या परिस्थितीत स्त्रियांनी निर्भयतेने काम करावे. यासाठी 'मी टू' मोहीम उपयोगी होईल. ही मोहीम आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

'महिला आयोग हे काही न्यायालय नाही' 
महिला आयोग हे काही न्यायालय नाही. महिलांच्या हक्काचे समर्थन करून त्यांना चालना देणे हे महिला आयोगाचे काम आहे. तर महिलांचा छळ होणार नाही, हे गृह विभागाचे काम आहे. तक्रार घेऊन गेल्यानंतर महिलांना पोलिस स्थानकांत तासनतास थांबावे लागते. त्यासाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्यांकडे महिलांनी तक्रारी द्याव्यात, असेही त्यांनी नमूद केले आहे.