Sat, Jul 20, 2019 10:47होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : शिवजयंती मिरवणुकीत चौघांवर जीवघेणा हल्‍ला

शिवजयंती मिरवणुकीत चौघांवर जीवघेणा हल्‍ला

Published On: Apr 17 2018 11:33AM | Last Updated: Apr 17 2018 3:22PMरूकडी : वार्ताहर

माणगाव (ता. हातकणंगले) येथे शिवज्योत मिरवणुकीमध्ये अग्रभागी राहण्यावरून दोन गटांत  जोरदार हाणामारी झाली. यावेळी वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करणार्‍या माजी उपसरपंच राजू जगदाळे यांच्यासह दोन्ही गटांतील सातजण जखमी झाले आहेत. या हाणामारीत तलवार, लोखंडी गज, दगड, विटांचा वापर झाला. या घटनेची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली असून, दोन्ही  गटांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.

याप्रकरणी जखमी उमेश दादासोा कोळी (वय 31, रा. माणगाव) यांनी फिर्याद दिली आहे. हातकणंगले पोलिस ठाण्यात लखन खंडेराव घोरपडे, सूरज बाळासोा तांदळे, अविनाश अशोक जगदाळे,  धीरज रावसाहेब तांदळे, राम खंडेराव घोरपडे, सूरज संजय तांदळे, सुशांत अनिल कांबळे, शंकर मोहन घोरपडे या आठजणांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. 

जखमी माजी उपसरपंच जगदाळे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हाणामारीत उमेश कोळी, राकेश कोळी, गुंडू जाधव, बाळासोा तांदळे, सूरज तांदळे, दत्तात्रय बन्‍ने हे जखमी आहेत. जखमींवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली आहे.

शिवजयंतीनिमित्त माणगाव येथील युवकांनी पन्हाळगडावरून शिवज्योत आणली होती. शिवज्योत माणगाव फाटा, ए. पी. मगदूम हायस्कूल या मुख्य मार्गावरून  शिवाजी चौकाकडे येत होती. दरम्यान, काही युवक गावात सकाळपासून गाड्यांचा सायलेन्सर काढून मोठा गोंगाट करीत गाड्या पळवीत होते. शिवाजी चौक परिसरात या हुल्लडबाज युवकांनी शिवज्योत मिरवणुकीच्या मागून प्रवेश केल्याने मिरवणुकीतील कार्यकर्ते  व त्यांच्यात वाद सरू झाला. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. 

गावात शांतता राहावी म्हणून माजी उपसरपंच राजू जगदाळे, माजी सरपंच अनिल जगदाळे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; पण यापैकी  एका गटातील कार्यकर्त्यांनी तलवार, काठी, गज, विटा आणि दगडांनी हल्ला जोरदार चढविला. त्यामुळे दुसरा गटही आक्रमक झाला. त्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. जयसिंगपूरचे  डीवायएसपी  कृष्णात पिंगळे, हातकणंगलेचे  पोलिस निरीक्षक सी. एल. डुबल पोलिस फौजफाट्यासह गावात तळ  ठोकून आहेत. अधिक तपास पोलिस निरीक्षक डुबल करीत आहेत.