Tue, Mar 26, 2019 01:36होमपेज › Kolhapur › शिवाजी विद्यापीठातील लोककला केंद्रास राष्ट्रमाता जिजाऊंचे नाव द्या

शिवाजी विद्यापीठातील लोककला केंद्रास राष्ट्रमाता जिजाऊंचे नाव द्या

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 14 2018 12:06AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठामध्ये दिक्षांत समारंभासह इतर अनेक महत्त्वाचे कार्यक्रम होणार्‍या लोककला केंद्रास राष्ट्रमाता जिजाऊंचे नाव द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने निवेदनाद्वारे शुक्रवारी केली. विद्यापीठास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आहे. छत्रपती शिवरायांना घडविणारे  शहाजी महाराज व जिजाऊ यांचे या परिसरात पुतळे उभा करावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. तसेच शिवरायांच्या  आयुष्यातील विविध घटना आणि प्रसंगांची माहिती देणार्‍या संग्रहालयाची उभारणी करावी, असे निवेदनात म्हटले आहे. 

निवेदनात म्हटले आहे, विद्यापीठातील लोककला केंद्रास राष्ट्रमाता जिजाऊंचे नाव द्यावे, या मागणीचे निवेदन यापूर्वी दोन वेळा दिले आहे; पण अद्यापही विद्यापीठ स्तरावर नाव देण्याबाबत कोणतीही हालचाल दिसत नाही.  छत्रपती शिवाजी महाराजांचे  नाव विद्यापीठास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री  जिजाऊंनी त्यांची योग्य प्रकारे जडण घडण करत स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली. त्यामुळे त्यांच्या  स्मृती विद्यापीठात जतन झाल्या पाहिजेत. त्यामुळे या हॉलला त्यांचे नाव द्यावे. शिष्टमंडळास उत्तर देताना कुलगुरू देवानंद शिंदे म्हणाले, नाव बदलण्याचा पूर्ण अधिकार मंडळास आहे. त्यांच्यासमोर हा प्रस्ताव मांडला जाईल.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या संग्राहालयाच्या इमारतीचे काम पूर्णत्वास गेले आहे. त्यामुळे येत्या काळात हे संग्रहालय अस्तित्वात येणार आहे. शिष्टमंडळाचे नेतृत्व मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले. यावेळी इंद्रजित सावंत, बबन रानगे, शशिकांत पाटील, प्रकाश पाटील, शिरीष जाधव, शरद साळुंखे, सुजित खामकर, अवधूत पाटील उपस्थित होते.