Tue, Apr 23, 2019 00:02होमपेज › Kolhapur › शिवाजी विद्यापीठाचे प्रलंबित निकाल रविवारपर्यंत होणार

शिवाजी विद्यापीठाचे प्रलंबित निकाल रविवारपर्यंत होणार

Published On: Sep 13 2018 1:44AM | Last Updated: Sep 13 2018 1:26AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठांतर्गत तीन लाख विद्यार्थी परीक्षेस बसतात. एमकेसीएल या एजन्सीकडून अपेक्षित माहितीबाबत समस्या निर्माण झाल्याने अनेक निकालात त्रुटी असल्याची स्पष्ट कबुली परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी बुधवारी दिली. तसेच सध्या 1,064 विद्यार्थ्यांच्या निकालात त्रुटी असून, संबंधित निकाल 16 सप्टेंबरपर्यंत लावले जातील, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. प्रशासन आणि शिवसेनेची विद्यार्थ्यांचे प्रलंबित निकाल या विषयावर बुधवारी बैठक झाली. 

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, 98 टक्के निकाल लागले आहेत. उर्वरित निकालाची कार्यवाही सुरू आहे. आ. राजेश क्षीरसागर यांनी, विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश घेण्यामध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे परीक्षा विभागाने स्पष्ट माहिती द्यावी, अशी सूचना केली. यावेळी संचालक काकडे म्हणाले, एमकेसीएल ही एजन्सी यापूर्वी प्रवेश, परीक्षा आणि निकाल प्रक्रिया राबवत असे. आता विद्यापीठ प्रशासनाकडून सर्व परीक्षा घेतल्या जातात. 2008 पासून काही विद्यार्थी अद्यापही परीक्षा देत आहेत. अशा विद्यार्थ्यांची माहिती अपुरी आहे. त्यामुळेच एका पीआरएन क्रमांकावर दोन परीक्षा, चुकीचे उल्लेख असे प्रकार घडले आहेत. आम्ही याबाबत तातडीने पावले उचलून प्रक्रिया सुरळीत केली आहे. आता अशा 316 विद्यार्थ्यांची माहिती अपुरी असून, संबंधित कॉलेजना याबाबत सूचना केल्या आहेत. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, डॉ. व्ही. एन. शिंदे आदींसह युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

रिक्‍त पदांचा विषय अधिवेशनात मांडणार

विद्यापीठात मंजूर पदांपैकी 30 टक्के रिक्‍त पदे आहेत. तसेच परीक्षा विभागात 132 पदांपैकी निवृत्तीनंतर सध्या 68 पदे असून, यापैकी 14 जण निवडणूक प्रक्रियेच्या कामासाठी आहेत, अशी माहिती आ. क्षीरसागर यांनी विचारलेल्या प्रश्‍नांवर प्रशासनाकडून देण्यात आली. यावेळी आ. क्षीरसागर म्हणाले, विद्यापीठाच्या रिक्‍त पदांचा विषय विधानसभेत मांडतो. तसेच परीक्षांच्या कामात महिलावर्गाला नाहक त्रास देऊ नका, अशी सूचना त्यांनी केली.